एकता आणि शोभा कपूर यांच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा, ‘गंदी बात’मध्ये अल्पवयीन मुलींची आक्षेपार्ह दृश्ये

अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘गंदी बात’ या सीरिजमध्ये अल्पवयीन मुलींची आक्षेपार्ह दृश्ये चित्रित केल्याप्रकरणी निर्मात्या शोभा कपूर आणि एकता कपूर यांच्याविरोधात एमएचबी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्ये अल्पवयीन मुलींची आक्षेपार्ह दृश्ये चित्रित केल्यामुळे स्वप्नील हिरे यांनी आक्षेप घेत त्यासंबंधी तक्रार दिली होती. तक्रारीवरून न्यायालयाने आदेश दिल्यावर शुक्रवारी एमएचबी पोलिसांनी अल्ट बालाजी टेलिफिल्मच्या संचालिका एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एमएचबी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, ज्या मुलीचा वापर करण्यात आला ती मुलगी कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच तिच्या पालकांनीदेखील कुठलीही तक्रार केली नसल्याचे समजते.