पेनल्टी गोल चुकला अन् रोनाल्डो रडला; पोर्तुगालकडून स्लोवेनिया शूट‘आऊट’

स्लोवेनियासारख्या संघाने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व लढतीत चांगलेच झुंजविले. या लढतीत पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना कर्णधार रोनाल्डो चुकला अन् त्यानंतर ढसढसा रडला. रोनाल्डोला रडताना बघून स्टेडियममध्ये उपस्थित असलेली त्याची आई मारिया यांनाही अश्रू अन् हुंदके अनावर झाले.

रोनाल्डोने पेनल्टी गोल केला असता तर कदाचित पोर्तुगालने निर्धारित वेळेत सामना जिंकला असता, मात्र हा गोल चुकल्यानंतरही या स्टार खेळाडूने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानावर सर्वस्व पणाला लावले. मात्र निर्धारित आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेतही गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटू न शकल्याने हा सामना शूटआऊटमध्ये गेला.

पेनल्टीवर गोल करण्यात अपयशी ठरलेल्या रोनाल्डोने शूटआऊटमध्ये पहिल्याच प्रयत्नासाठी येत गोल केला. त्यानंतर ब्रुनो फर्नांडिस व बर्नार्डो सिल्वाने पोर्तुगालसाठी गोल केले. पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगा कोस्टा खऱया अर्थाने या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्लोवेनियाच्या जोसिप इलिसिक, जुरे बाल्कोवेक व बेंजामिन वर्बिक या खेळाडूंच्या पेनल्टी लागोपाठ अडवून पोर्तुगालला 3-0 गोलफरकाने विजय मिळवून दिला.

या विजयासह पोर्तुगालने उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आता शनिवार, 6 जुलैला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पोर्तुगाल-फ्रान्स असा तुल्यबळ सामना रंगणार आहे.