निवडणूक निकालात बहुमत मिळूनही महायुती सरकारचा मुख्यमंत्री ठरण्यास बरेच दिवस गेले. मुख्यमंत्री ठरल्यानंतर विस्ताराला 23 दिवस गेले आणि खातेवाटपासाठी हिवाळी अधिवेशन संपण्याची प्रतीक्षा करावी लागली. महायुती सरकारचे खातेवाटप आज जाहीर केले गेले. गृह खात्यासाठी अडून बसलेल्या एकनाथ शिंदे यांची या खातेवाटपात निराशाच झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते स्वतःजवळच ठेवले असून अर्थ खातेही पुन्हा अजित पवार यांच्या पदरात टाकून मिंध्यांना डिवचले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमध्ये रविवार, 15 डिसेंबर रोजी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यावेळी 33 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. खातेवाटप रखडल्याने नागपूरच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सगळे बिनखात्याचे मंत्री ठरले होते. अखेर आज अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खतेवाटप जाहीर करण्यात आले.
मिंध्यांच्या पदरी निराशाच
गृहमंत्री पदासाठी अडून बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पदरी खातेवाटपात निराशाच पडली. त्यांना गृहखाते न देता मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते स्वतःकडेच ठेवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सोपवून त्यांनी शिंदे यांच्या जखमेवर मीठ चोळले. पण ते जास्त झोंबणार नाही याचीही काळजी घेण्याचा शहाणपणा दाखवला. शिंदे यांना नगरविकास विभागाबरोबर गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे.
कुणाला कुठले खाते
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क, तसेच कोणत्याही मंत्र्यांकडे न दिलेले विभाग
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण
- उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ
- चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
- राधाकृष्ण विखे-पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
- हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
- चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज मंत्री
- गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
- गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
- गणेश नाईक – वन मंत्रालय
- दादाजी भुसे – शालेय शिक्षण
- संजय राठोड – मृद व जलसंधारण
- धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
- मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता
- उदय सामंत – उद्योग, मराठी भाषा
- जयकुमार रावल – पणन, राजशिष्टाचार
- पंकजा मुंडे – पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन
- अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नवीनीकरण
- अशोक उईके – आदिवासी विकास
- शंभुराज देसाई – पर्यटन, खनिकर्म आणि स्वातंत्र्यसैनिक कल्याण मंत्रालय
- आशीष शेलार – माहिती आणि तंत्रज्ञान, सांस्कृतिक
- दत्तात्रय भरणे – क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ
- अदिती तटकरे – महिला आणि बालविकास
- शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
- माणिकराव कोकाटे – कृषी
- जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
- नरहरी झिरवाळ – अन्न आणि औषध प्रशासन
- संजय सावकारे – वस्त्रोद्योग
- संजय शिरसाट – सामाजिक न्याय
- प्रताप सरनाईक – परिवहन
- भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, मिठागरे आणि पाणथळ जमीन विकास
- मकरंद पाटील – मदत आणि पुनर्वसन
- नितेश राणे – मत्स्यव्यवसाय, बंदरे
- आकाश फुंडकर – कामगार
- बाबासाहेब पाटील – सहकार
- प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
- माधुरी मिसाळ – नगर विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ
- आशीष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी आणि न्याय, कामगार
- मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण. पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम
- इंद्रनील नाईक – उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण
- योगेश कदम – गृह (शहरी), महसूल, ग्राम विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन
- पंकज भोयर – गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म