
पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याची माहिती व्हॅटिकनकडून देण्यात आली आहे. संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचणाऱ्या पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या 88 व्या वर्षी आज सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला आयुष्यातील मूल्ये शिकवली आणि धैर्य तसेच प्रेमाचा संदेश दिला, असा एक व्हिडिओ संदेश व्हॅटिकनने जारी केला असून त्यात पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याचे म्हटले आहे.
रोम कॅथलिक चर्चचे ते पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस होते. त्यांच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु, नंतर हळूहळू त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, आज सकाळी 7 वाजून 35 मिनीटांनी पोप फ्रान्सिस अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
2013 मध्ये पोप म्हणून निवड
कार्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची 2013 मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली. त्यांना पोप फ्रान्सिस म्हटले जात होते. पोपपदावर निवड होणारे युरोपाबाहेरचे ते पहिले पोप ठरले. 266 व्या पोपपदी त्यांची निवड झाली होती.
12 वर्षांत अनेकदा रुग्णालयात
गेल्या 12 वर्षांच्या कालावधीत पोप फ्रान्सिस यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले होते. मार्च 2013 मध्ये त्यांना ब्राँकायटिसममुळे तीन दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखी एका आजारपणामुळे त्यांना 2023 मध्ये युएईमध्ये झालेल्या जागतिक हवामान परिषदेला उपस्थित राहता आले नव्हते.
दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल स्पेनने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे मंत्री फेलिक्स बोलानेस यांनीही पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पेंट हाऊस नाकारल्याने चर्चेत
आतापर्यंतचे सर्व पोप हे व्हॅटिकन सिटीतील मोठे पेंट हाऊस अपार्टमेंटमध्ये राहत असत. परंतु, पोप फ्रान्सिस यांनी ते पेंट हाऊस नाकारले. त्यांनी स्वतःसाठी गेस्ट हाऊसमधील छोटे घर निवडले. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची जगभरात प्रचंड चर्चा झाली. पोप फ्रान्सिस यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील मुक्त बाजार या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच चर्चने समलिंगी लोकांबद्दल मत व्यक्त करण्यापेक्षा त्यांची माफी मागायला हवी असे वक्तव्य केले होते.
व्हॅटिकनमध्ये दफन करणार नाही
पोपना सहसा व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर बॅसिलिका अंतर्गत गुहांमध्ये दफन केले जाते. परंतु, पोप फ्रान्सिस यांना रोममधील टायबर नदीच्या पलीकडे असलेल्या सांता मारिया मेंगिओर बॅसिलिकामध्ये दफन केले जाणार आहे. पोप यांनी डिसेंबर 2023 मध्ये खुलासा केला होता की सांता मारिया मेंगिओर बॅसिलिकामध्ये त्यांचे दफनस्थान असेल. या ठिकाणाशी एक विशेष संबंध असल्याची भावना मनात आहे, असे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले होते.
पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली
पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले. या दुःखाच्या प्रसंगी जगातील कॅथोलिक समुदायाप्रती माझ्या मनापासून संवेदना. पोप फ्रान्सिस हे करुणा, नम्रता आणि अध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून जगभरातील लाखो लोक नेहमीच त्यांना लक्षात ठेवतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.