मुंबई-बडोदा महामार्गासाठी तलासरीत शेकडो झाडांची कत्तल, शेतजमिनीवर बुलडोझर फिरवला; जबरदस्तीने भूसंपादन

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनासाठी गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांवर जबरदस्ती सुरू आहे. आज तर हद्द झाली. तलासरी तालुक्यातील कोचाई गावात 25 आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर बुलडोझर फिरवण्यात आला असून शेकडो झाडेही तोडली. त्यामुळे आदिवासींची कुटुंबे बेघर झाली आहेत. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्तात ही तोडक कारवाई करण्यात आली. वारंवार अर्ज-विनंत्या करूनही आदिवासींना मोबदल्याची फुटकी कवडीदेखील न मिळाल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेसाठी तलासरी तालुक्यातून 15 ते 18 किलोमीटरचा मार्ग जात आहे. त्यासाठी 95 टक्के भूसंपादन झाले असून तलासरी तालुक्यातील जुना वारपाडा व वडीपाडा येथील जमीन अद्याप प्रशासनाने ताब्यात घेतली नव्हती. या जमिनीवर 25 आदिवासी शेतकरी कुटुंबे तीन-चार पिढ्यांपासून राहत आहेत. तसेच येथील जमिनीदेखील कसत आहेत. ही जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने येथील कुटुंबांवर अनेकदा दबाव टाकला. आज मोठ्या पोलीस फौजफाट्यासह अधिकारी व कर्मचारी कोचाई गावात दाखल झाले आणि विरोध असूनही 25 झाडे तोडण्यात आली.

आम्ही जायचे कुठे? खायचे काय?

आज अचानकपणे तलासरीमधील शेतकऱ्यांची झाडे तोडल्यामुळे तसेच शेतजमिनीवर बुलडोझर फिरवल्याने त्यांची रोजीरोटीच हिरावली गेली आहे. आता आम्ही जायचे कुठे? खायचे काय? असा संतप्त सवाल आदिवासी महिलांनी पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना केला.

■ कोचाई गावातील आंबा, पेरू, नारळ, शेवगाच्या शेंगा अशी विविध प्रकारची झाडे मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेसाठी तोडण्यात आल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

■ झाडे तोडल्यानंतर शेतजमिनीवर बुलडोझर फिरवण्यात आला. ही कारवाई करण्यापूर्वी ना पूर्वकल्पना दिली ना कोणतीही नोटीस बजावली. या कारवाईचा पालघर जिल्ह्यात सर्वत्र निषेध केला जात आहे.

■ कोचाई आणि मासन गावातील शेतकऱ्यांना नियमानुसार घर, झाडे व अन्य बाबींसाठी नुकसानभरपाई दिली असून त्यांच्याकडे धनादेशही सुपूर्द केला असल्याचा दावा सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी केला आहे.