मागे वळून पाहताना – मथुरा ते मुंबई

>> पूजा सामंत

`गदर 1′ नंतर `गदर 2′ या दोन्ही चित्रपटांना घवघवीत यश लाभले आणि ज्येष्ठ दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे नाव पडले `गदर फेम अनिल शर्मा’! `गदर 3′ 2026मध्ये रिलीज करण्याचा त्यांचा मानस आहे. अनिल शर्मा अनेक कष्टदायक अनुभवांना तोंड देत इथवर पोहोचले आहेत. बी. आर. चोप्रा या वरिष्ठ दिग्दर्शकाकडे त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी सहायक दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनाचे धडे गिरवलेत. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली आणि `श्रद्धांजली’ चित्रपट केला. शून्यातून स्वर्ग निर्माण करणे सोपे नसते. मथुरा ते मुंबई हा अनिल शर्मा यांचा जीवन प्रवास प्रेरित करणारा आहे.

एका मोठय़ा संयुक्त कुटुंबात मी जन्मलो. माझे आजोबा आणि माझे वडील त्या काळात अतिशय नामांकित ज्योतिषी होते. घरचं वातावरण धार्मिक होतं. आजोबांचा ज्योतिषविषयक सल्ला घेण्यास अनेकजण आमच्याकडे येत. मुंबईहून प्रसिद्ध गायिका गीता दत्त मथुरेला आजोबांचा सल्ला घेण्यासाठी आमच्या घरी यायची हे मला आठवतंय. श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या या शहरात आध्यात्मिक-धार्मिक वातावरण असल्याने मी 13 वर्षांचा होईपर्यंत भगवद्गीता मला अखंड पाठ होती. रामायण वरचेवर घरी वाचले जाई. तोपर्यंत सिनेमा मला माहीत नव्हता. एकदा आजोबांसमवेत मी शहरात गेलो असताना तिथे एक भलंमोठं सिनेमा थिएटर पाहिलं. आजोबांच्या मागे लागून तिथे प्रथमच रुपेरी पडदा आणि सिनेमा पाहिला. `गंगा की लहरें’ असं त्याचं नाव होतं. हाच सिनेमा पुढे माझं करीअर बनेल हे मला ठाऊकही नव्हतं. पुढे माझ्या वडिलांनी ज्योतिष पाहणं मुंबईत सुरू केलं. अधूनमधून वडिलांना भेटण्यासाठी मी मुंबईत येऊ लागलो. प्रथम आलो तेव्हा दादरहून खारला जाण्यासाठी टॅक्सीत बसलो. जाताना सिनेमाची पोस्टर्स पाहत होतो. एका ठिकाणी राजेश खन्नाचे मोठे पोस्टर लागले होते. मी फार भारावून गेलो. मुंबईत आल्यावर वडिलांनी छोटय़ा प्रमाणात चित्रपट निर्मिती सुरू केली आणि त्यांनी 1976मध्ये `मीरा श्याम’ या फिल्मची निर्मिती केली. माझे सुट्टीचे दिवस असल्याने कलाकारांना जे लागेल ते पाहण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली.

आजोबांना विचारून मी वडिलांसोबत राहण्यासाठी मुंबईत (कायमचा) दाखल झालो. वडिलांनी मला माझे शाळेतले इंग्रजी, मराठी धडे मोठय़ाने वाचायला सांगितले. मराठी भाषा मला 1977 पासूनच येऊ लागली. वडील निर्माते झाल्यावर मलाही पंख फुटले. मनातल्या मनात मी स्वत `हिरो’ व्हायची स्वप्नं पाहू लागलो. मुंबईत मी एक ग्रुप बनवला आणि आठवडय़ातून एकदा काही नाटकांचे अभिवाचन, अभिनय सुरू केला. अभिनय अंगात भिनत गेला. एक एक नाटकही लिहिलं. त्याचं नाव होतं `बुरे फसे’ हे नाटक माझ्या वडिलांचे मित्र पंडित नरेंद्र शर्मा यांनी पाहिलं आणि माझी तारीफ केली. नरेंद्र शर्मा यांनी राज कपूर यांच्या `सत्यम शिवम सुंदरम’ सिनेमासाठी गीते लिहिली होती.

माझ्या वडिलांची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं. सिनेमाच्या गारुडाने मला सिनेमा सोडून दुसरं काहीच जमणारं नव्हतं. नरेंद्र शर्मा यांनी वडिलांची समजूत काढली आणि मला चित्रपट क्षेत्रात काम करू द्यावं असं सांगितलं. वडिलांनी ते मान्य केलं. वडिलांची बी.आर. चोप्रा यांच्याशी ओळख होती. “त्यांच्याकडे मला घेऊन चला” असा मी हट्ट धरला आणि आम्ही त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो. बी.आर मला “काही कथानक आहे का?” असे विचारतील म्हणून मी दोन-तीन दिवसांत `तुम्हारे लिए’ या फिल्मची कथा लिहून काढली होती. आम्ही चोप्रांकडे गेलो तेव्हा मला त्यांच्या भेटीचं दडपण होतं. पण ते प्रेमाने भेटले. “काही कथा डोक्यात आहे का?” असं त्यांनी विचारलं. मी उत्साहाने कथा ऐकवली. ते प्रभावित झाले. “अरे, इस कहानी पर तो फिल्म बन सकती है” असं त्यांनी म्हटलं. माझ्यासाठी त्यांचे शब्द एखाद्या गोल्ड मेडलसारखे होते. “मी सध्या तुम्हाला साहाय्य करू का?” असं विचारल्यावर त्यांनी होकार दिला. हाच माझा खऱया अर्थाने चित्रपटसृष्टीत प्रवेश होता. सर्वसाधारणपणे चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवण्यासाठी अनेकांना जे धक्के खावे लागतात, जो अथक संघर्ष असतो, तसं माझं झालं नाही हा माझ्या नशिबाचा भाग. माझ्या वाडवडिलांनी केलेल्या पुण्याईचा मला वरदहस्त लाभला होता.

जो देश एकत्र कुटुंब पद्धतीसाठी, एकतेसाठी, संस्कृतीसाठी प्रसिद्ध होता, त्याच देशात वृद्धांना इतकी असहनीय वागणूक मिळू लागली आहे या व्यथेतून मी `वनवास’ चित्रपटाची निर्मिती केली. ज्या कुटुंबात मी वाढलो, त्या कुटुंबात, शेजारीपाजारी, त्या शहरात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातल्या वृद्धांचे हाल होत नसत. जे आता मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळत आहेत. `वनवास’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार मोठा विजय मिळवू शकला नाही, पण प्रेक्षकांनी चित्रपटावर उत्स्फूर्त प्रतिािढया दिल्या. हा चित्रपट आजच्या काळाची नितांत गरज असल्याचे प्रेक्षक म्हणाले. त्यामुळे मला माझ्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

मथुरा शहरात वाढत असताना मी सिनेमा नावाच्या असुरक्षित क्षेत्रात करीअर करेन असं मलाच काय, पण कुणालाही वाटलं नव्हतं. शिक्षणासाठी मी मुंबईत आलो काय आणि या मायानगरीतल्या चंदेरी दुनियेचं गारूड माझ्यावर झालं काय… आणि प्रख्यात चित्रपट निर्माते बी.आर. चोप्रा यांचा सहायक दिग्दर्शक बनलो काय. या प्रवासात मी बी.कॉमची परीक्षा दिली. चोप्रासाहेब त्या वेळेस म्हणजे 1980च्या दशकात `बर्निंग ट्रेन’ नावाचा चित्रपट काढत होते. धर्मेंद्र, हेमा मालिनी, विनोद खन्ना, जितेंद्र, परवीन बाबी आणि अन्य कलाकार यात होते. चोप्रा यांचा सहायक मी असल्याने माझा आणि धरमजी (धर्मेंद्र) यांचा परिचय 1979-80 पासून झाला. इतक्या मोठय़ा नामांकित स्टारमध्ये जरादेखील अहंकार नव्हता .
त्यांच्यातील साधेपणा मला भावून गेला. त्यांच्याशी माझी मैत्री उत्तरोत्तर वाढतच गेली. मी धरमजींसोबत `ऐलान ए जंग’, `तहलका’ चित्रपट काढले, जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. पुढे धरमजी यांचा मुलगा सनी याच्याशी माझी गट्टी जमली आणि आम्ही काढलेल्या `गदर 1′ व `गदर 2′ यांनी बॉक्स ऑफिसवर खूप यश मिळवलं. चोप्रा त्या काळात `पती पत्नी और वो’ बनवत होते. संजीव कुमार याची त्याच्या प्रेयसीला भेटल्यानंतर कळी खुलते. तो खांद्यावर ट्रान्झिस्टर घेऊन गाणं गुणगुणत येतो, अशी त्याची घरी एंट्री व्हावी असं मी सुचवलं. माझ्या या सूचनेची त्वरित दखल चोप्रासाहेबांनी घेतली, तसा प्रसंग चित्रित झाला. संजीव कुमार घरी पत्नी असताना प्रेयसीकडे जातो. त्यामुळे घरी येताना त्याला अपराधीपणाची भावना असते, पण `मी नाही त्यातला’ असं दाखवण्यासाठी तो शक्य होईल तितका नॉर्मल राहतो असं सुचवायचं होतं या प्रसंगातून. या अचूक प्रसंगामुळे मला चित्रपट माध्यमाची समज आहे असं मत चोप्रा यांचं झालं.

`श्रद्धांजली’ हा माझा पहिला चित्रपट काढण्याचं मी साहस केलं. प्रसिद्ध अभिनेत्री राखी हिला मध्यवर्ती भूमिकेत घेण्यासाठी मी उत्सुक होतो. घाबरत मी त्यांना फोन केला. त्यांनी कथा ऐकवण्यास सांगितलं. नंतर मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी होकार दिला. साइनिंग अमाऊंट देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्या आत्याकडून मी हजार रूपये उधार घेतले आणि माझ्याकडचा एक रुपया पाकिटात घालून मी तो राखीला दिला. तो माझ्यासाठी खूप आशावादी, भावुक करणारा अनुभव होता. खरं म्हणजे राखी त्या काळात किमान 51 हजार साइनिंग अमाऊंट घेत असे, पण तिने इतकी कमी रक्कम स्वीकारणं हे माझं भाग्यच समजतो. राखीसारख्या `ए’ ग्रेड अभिनेत्रीने माझ्यासारख्या नवोदित दिग्दर्शकाचा चित्रपट स्वीकारणं ही 1980मधील मोठी घटना होती. राखीने होकार दिल्यावर दीपक पराशर, सुरेश ओबेराय, अरुण गोविल असे सगळे कलावंत होकार देत गेले आणि मी अवघ्या 40 दिवसांत सिनेमा बनवला जो सुपरहिट ठरला.

1980 नंतर मी `बंधन कच्चे धागो का’ या सिनेमाची निर्मिती-दिग्दर्शन केलं. राखी, झीनत अमान, शशी कपूर अशी स्टार मंडळी यात होती. शशी कपूरसारख्या त्या काळच्या मोठय़ा स्टारला नारेशन देताना माझी घाबरगुंडी उडाली होती. मला वाटलं, याला इंग्रजीत नॅरेशन द्यावं. पण माझं इंग्रजी तितकं चांगलं नव्हतं. हिंदीत बोलताना मी नर्व्हस झालो, पण शशी स्वभावाने इतका उत्तम होता की त्याने मला म्हटलं, “अरे यार, पहले पानी पी, फिर नॅरेशन सुनाना!” त्याच्या शब्दांनी मला धीर दिला. दिग्दर्शकाला समजून घेणारे, त्याचा आदर करणारे कलावंत हल्ली विरळाच! झीनत अमानची त्या काळात एक प्रचंड ाsढझ होती. भारतीय महिलांनी वेस्टर्न कपडे घालावेत असा अप्रत्यक्ष संदेश तिच्या फॅशन आयकान असलेल्या इमेजने दिला. चोप्रासोबत काम करताना त्यांच्या `इन्साफ का तराजू’मध्ये झीनत असल्याने तिच्याशी माझा पूर्वपरिचय होताच. त्यामुळे तिच्याशी संपर्क साधून तिच्याकडून मी होकार मिळवला. झीनतला शरीर झाकलं जाईल असे कॉ
स्च्युम्स दिले. ती म्हणाली, “मी पहिला दिग्दर्शक आहे, ज्याने असा पेहराव तिला दिला.” ती आश्चर्यचकित झाली होती.

मी तिला विनयाने म्हटलं, “मॅडम, आपका जिस्म फिल्मो मे नजर आया. लेकिन किसीने अभी तक आपके भीतर के व्यक्तित्व को टॅप नहीं किया ऐसा मेरा मानना है!” झीनतला माझ्या उत्तराने अश्रु आवरले नाहीत.

त्यानंतर मी `हुकूमत’, `ऐलान ए जंग’, `तहलका’ वगैरे अॅक्शन चित्रपट काढले, ज्यात धरमजी होते. `हुकूमत’ खूप चालला. 75 आठवडे एकाच ठिकाणी होता. `बर्निंग ट्रेन’ या सिनेमावेळी धरमशी परिचय झाला होता. `बर्निंग ट्रेन’ हा आपल्या देशातील पहिला चित्रपट, ज्यात विदेशी टेक्निशियन बोलावलं होतं. चोप्रासाहेबांनी मला `कॉल शीट’ दिली आणि प्रत्येक कलाकाराला दुसऱया दिवशी किती वाजता यायचं हे लेखी मागितलं होतं. मी चोप्रा यांचा सहायक होतो. धरमजी निघाले तेव्हा त्यांना कॉल शीट देण्यासाठी मी त्यांच्या कारला थांबवलं. कॉल शीट पाहून धर्मेंद्रने ती कॉल शीट भिरकावून दिली. चोप्रा यांना माझं वेळापत्रक माहीत आहे असं रागाने म्हणाले. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं असावं की मी नवखा आहे. त्यांनी विचारलं, “क्यो, यहां नये नये आए हो क्या?” मी होकार दिल्यावर धर्मेंद्रनी हसून कॉल शीटवर सही केली आणि त्यांची कार धुरळा उडवत निघून गेली. तर असा माझा आणि धरमजी यांचा परिचय. मग कौटुंबिक मैत्री झाली, जी आजतागायत आहे. अनेक प्रसंग आहेत माझ्या स्मृतीत त्यांचे.

`गदर-एक प्रेमकथा’ आणि नंतर अनेक वर्षांनी आलेल्या `गदर 2’ने माझा आर्थिक संघर्ष संपला. सिनेमावरील प्रेमापोटी मी चित्रपट निर्मिती केली. पैसे मिळवणं हे लक्ष्य ठेवून नाही. सध्या `गदर 3’च्या कामात व्यस्त आहे. तुमच्या शुभेच्छा असू द्या पाठीशी!

[email protected]