शासकीय बैठकीला राज्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या लेकी’ची उपस्थिती, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठक घेतली. या बैठकीला माधुरी मिसाळ यांची मुलगी पूजा मिसाळ यांनीही उपस्थिती लावली. सरकारी बैठकीला राज्यमंत्र्यांची ‘लाडकी मुलगी’ कशी, असा प्रश्न सरकार या अधिकाऱ्यांच्या चेह्ऱ्यावर निर्माण झाला होता. पण राज्यमंत्र्यांची नाराजी नको म्हणून कोणी आक्षेप घेतला नाही.

माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अखत्यारितील विभागांच्या आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली. या बैठकीला मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे सहआयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हस्के यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या फेसबुक हॅण्डलवर या बैठकीची एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत त्यांची मुलगी पूजा बैठकीला उपस्थित असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे

नियम काय सांगतो

शासकीय बैठकाRना कोण उपस्थित राहू शकते यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे राज्याच्या राजशिष्टाचार विभागाने आखून दिली आहेत. त्यानुसार मंत्र्यांची मुले शासकीय बैठकांना उपस्थित राहू शकत नाहीत. मंत्र्यांच्या या बैठकांना संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारीच उपस्थित राहू शकतात. मंत्र्यांचे नातेवाईक या बैठकांना उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे माधुरी मिसाळ यांची मुलगी कशी उपस्थित राहिली हा प्रश्न निर्माण झाला आहे.