पूजा खेडकर यांना वायसीएम रुग्णालयातून अस्थीव्यंगाचे प्रमाणपत्र

गेल्या पंधरा दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून अस्थिव्यंगाचे प्रमाणपत्र घेतल्याची बाब समोर आली आहे. त्यांनी 2022 मध्ये वायसीएममधून अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतले आहे.

पूजा खेडकर यांनी श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या वेळी फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. त्यात दिव्यांग असल्याचा उल्लेख नव्हता. महाविद्यालयाचे संचालक अरविंद भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांनी 2007 साली प्रवेश घेतला होता. त्यांना सीईटीच्या माध्यमातून प्रवेश मिळाला होता. तेव्हा त्यांनी जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता आणि नॉन क्रिमिलिअरचे प्रमाणपत्र दिले होते. यासह पूजा खेडकर यांनी मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र दिले होते.

नगरच्या रुग्णालयात कागदपत्रे सापडली

प्रक्षिणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयातून दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. त्यांना दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत कागदपत्रे सापडली आहेत.

खेडकर यांनी 2022 मध्ये वायसीएम आणि औंध जिल्हा रुग्णालयाला अर्ज केला होता. औंध रुग्णालयाच्या अगोदर वायसीएममध्ये त्यांचा अर्ज स्विकृत झाला. खेडकर यांना 7 टक्के अस्थिव्यंगाचे प्रमाणपत्र देताना त्यांची आरोग्य तपासणी केली आहे.
डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय