वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर आता केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC कडून कारवाईसाठी पावलं उचलण्यात येत आहे. UPSC पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आयएएस केडर रद्द करण्यासाठी आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी तिला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. खोटी ओळख, बोगस पत्ता आणि पालकांची नावं बदलली यावरून UPSC ने मोठी कारवाई केली आहे.
खासगी गाडीवर अंबर दिवा, कॅबिन, दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्रे, खोटा पत्ता यासह अनेक कारणांमुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडकर वादात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल UPSC ने घेतली आहे. UPSC ने या प्रकरणी एक पत्रक जारी करत माहिती दिली आहे. पूजा खेडकरचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी तिला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
आयएएस पद मिळवण्यासाठी पूजा खेडकरने जे गैरप्रकार केले आहेत ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. हे लक्षात घेऊन तिच्यावर UPSC कडून दिल्ली पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यूपीएससीने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली क्राईम ब्रँचने पूजा खेडकर विरोधात बनावटगिरी, फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी पूजा खेडकरच्या आईला अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्या वडिलांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. यामुळे पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेत.