महाराष्ट्रातील वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार करीत केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) फसवणूक केल्याच्या गुह्यात पूजाने अटक टाळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी शुक्रवारी पुन्हा तहकूब झाली. यूपीएससीने अर्जावर तीव्र आक्षेप घेतल्यामुळे पूजाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
यूपीएससीची परीक्षा देण्यासाठी पूजा खेडकरने कागदपत्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फेरफार केला. नावात बदल करण्याबरोबर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचा फायदा घेतला. या प्रकरणी यूपीएससीने गुन्हा दाखल केल्यानंतर पूजाला सनदी अधिकारी पद गमवावे लागले. या फसवणुकीच्या गुह्यात अटक टाळण्यासाठी तिने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र सरन्यायाधीशांच्या निरोप समारंभाला सर्व न्यायमूर्ती गेल्याने सुनावणी तहकूब झाली. यूपीएससी व दिल्ली पोलिसांनी अर्जाला केलेल्या तीव्र विरोधामुळे जामीन मिळणार की नाही, याची चिंता पूजा खेडकरला सतावत आहे.