अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्यांच्या जागी हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असणार आहेत. कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ आतापासूनच तामीळनाडूतील एका गावात मोठमोठे बॅनर लागले असून पूजाअर्चादेखील सुरू झाली आहे.
तामीळनाडूमधील थुलसेंद्रपुरम या गावाचा आणि कमला हॅरिस यांचा काय संबंध? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कमला हॅरिस यांचे आजोबा पीव्ही गोपालन हे याच गावचे रहिवासी होते. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेताच गावाच्या वेशीवर असलेल्या मंदिरात कमला हॅरिस यांच्यासाठी पूजाअर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेत मतदानाच्या दिवसापर्यंत ही पूजाअर्चा सुरू राहणार आहे.
‘‘आम्ही कमला हॅरिस यांच्यासाठी यापूर्वीही पूजा केली होती आणि त्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या. आमच्या देवाच्या आशीर्वादाने त्या राष्ट्राध्यक्ष होतील. गेल्या वेळी त्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या तेव्हा आम्ही जल्लोष केला होता. आता त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर हा जल्लोष आणखी मोठा होईल. ’’ असे मंदिराचे मुख्य पुजारी एम. नटराजन म्हणाले.