दिवाळीपूर्वीच 11 शहरांत प्रदूषणाचा कहर, दिल्ली बनले गॅस चेंबर, आग्य्राच्या ताजमहालालाही धोका

दिवाळीला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच देशभरातील प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे चित्र आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत देशातील 11 शहरांची एक्युआय म्हणजेच हवेच्या गुणवत्तेचा स्तर 300च्या वर नोंदवला गेला. यात भिवाडी, दिल्ली, नोएडा, मेरळ, गाझियाबाद, जयपूर, बुलंदशहर, अमृतसर, अलीगड, सोनीपत आणि फरिदाबाद या शहरांचा समावेश आहे. दरम्यान, मुंबईवरही धुरक्याची चादर पसरली असून मरीन ड्राइव्हचा क्वीन्स नेकलेसही त्यात हरवला. आग्य्राच्या ताजमहालालाही प्रदूषणामुळे धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, दिल्लीत प्रदूषण कमी करण्यासाठी जागोजागी पाणी फवारण्यात येत आहे.

610 एक्यूआयसह राजस्थानातील भिवाडी सर्वात धोकादायक स्थितीत आहे. दिल्लीचे तर अक्षरशः गॅस चेंबर बनले आहे. रविवारी सकाळी आनंद विहारमध्ये 400हून अधिक एक्यूआय नोंदवण्यात आला. आग्य्रामध्येही प्रदूषण आणि धुक्यामुळे ताजमहाल अस्पष्ट दिसत असल्याचे चित्र आहे. प्रदूषण वाढल्यामुळे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने 1 जानेवारी 2025पर्यंत फटाक्यांवर बंदी घातली आहे. शासन आदेशानुसार फटाके बनवणे, साठवणे, विक्री करणे आणि वापरणे यावर बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाही तर फटाक्यांच्या ऑनलाईन वितरणावरही बंदी घालण्यात येणार आहे. या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना आपला अहवाल रोज डीपीसीसीला सादर करावा लागणार आहे.

दिल्लीत हॉटेलात कोळसा वापरण्यावर बंदी

दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स 200च्या वर गेल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली एनसीआरमध्ये ग्रेप-1 लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये कोळसा आणि सरपण वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंटने एजन्सींना जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या वापरावर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते बांधणी, नूतनीकरण प्रकल्प आणि देखभाल यात धुरविरोधी गन, पाणी शिंपडणे आणि धूळ नाशक तंत्रज्ञानांचा वापर वाढवण्यास सांगण्यात आले आहे.