विधानसभा निवडणुकीसाठी आज रत्नागिरीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून 1747 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली. मतदानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हय़ामध्ये सुमारे 65 टक्के मतदान झाले.
जिल्हय़ातील पाच विधानसभा मतदारसंघात 38 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्हय़ामध्ये 1747 मतदान पेंद्रांमध्ये 13 लाख 23 हजार 413 मतदारांपैकी 65 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी 7 ते 9 या पहिल्या टप्प्यात मतदारांचा प्रतिसाद संथ होता. जिल्हय़ामध्ये 7 ते 9 दरम्यान 8.96 टक्के मतदान झाले. त्यामध्ये दापोलीत 8.54 टक्के, गुहागरमध्ये 9.16 टक्के, चिपळूणमध्ये 10.14 टक्के, रत्नागिरीत 9.07 टक्के आणि राजापुरात 8.89 टक्के मतदान झाले होते. 7 ते 11 वाजण्याच्या दरम्यान जिल्हय़ातील मतदानाची टक्केवारी 20.52 टक्क्यांवर पोहोचली. त्यावेळी दापोलीत 18.32 टक्के, गुहागरमध्ये 17.05 टक्के, चिपळूणमध्ये 24.57 टक्के, रत्नागिरीत 18.60 टक्के आणि राजापुरात 24.07 टक्के मतदान झाले होते. दुपारी 11 ते 1 या वेळेत मतदानाने वेग घेतला. जिल्हय़ामध्ये मतदानाचे प्रमाण 38.52 टक्क्यांवर पोहोचले. त्यामध्ये दापोलीत 37.01 टक्के, गुहागरमध्ये 40.45 टक्के, चिपळूणमध्ये 40.77 टक्के, रत्नागिरीत 32.02 टक्के आणि राजापूरात 40.98 टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हय़ातील मतदानाची टक्केवारी 60.35 टक्क्यांच्या घरात पोहोचली. त्यामध्ये दापोलीत 59.02 टक्के, गुहागरमध्ये 59.05 टक्के, चिपळूणमध्ये 63.51 टक्के, रत्नागिरीत 59 टक्के आणि राजापुरात 61.05 टक्के मतदान झाले होते.