
राजकारणात असलेल्या व्यक्तीच्या जीवनात धर्म असेल तर त्याने धर्माचे पालन करायला नको का? धर्माचार्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलू नये का? विश्वासघातासारख्या पापाबद्दल लोकांना जागृत करू नये का? धर्म मानणाऱ्या व्यक्तींनी विश्वासघातासारखे पाप करू नये असे सांगू नये का?
आम्ही संन्यासी आहोत. राजकीय वक्तव्य करत नाही. पण राजकारण्यांनीही धर्माच्या मुद्दय़ात हस्तक्षेप करू नये, असे खडेबोल सुनावतानाच धर्मातील राजकारण्यांचा हस्तक्षेप थांबला तर मी गॅरंटी देतो, राजकारणावर बोलणार नाही, असे परखड शब्दांत ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सोमवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाला असून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा विराजमान होवोत, असे शुभाशीर्वाद त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यावरून आज राजकारण रंगले. मोदी समर्थकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. धर्माचार्यांनी राजकारणावर बोलू नये, अशी टीका केली गेली. त्यावर स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी यांनी मंदिरात येऊन हिंदू धर्मामध्ये हस्तक्षेप केला तर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाते आणि शंकराचार्यांनी मंदिराबाबत, धर्माबाबत काही विधान केले तर संन्यासी व्यक्तीने असे करू नये असे म्हटले जाते? राजकारण्यांनी धर्मामध्ये हस्तक्षेप करणे बंद करावे, आम्ही गॅरंटी देतो की राजकारणात हस्तक्षेप करणार नाही, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
केवळ आपण हिंदू आहोत असे सांगणे योग्य नाही, धर्मतत्वाचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. हिंदू धर्माचे मर्म प्रत्येक हिंदूच्या मनात बिंबवणे हेच धर्माचार्यांचे काम आहे, असेही ते म्हणाले.