पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू असून, पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, निष्ठावंत भाजपाईमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. असे असतानाच चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, यापूर्वीच नऊ माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.’
कै. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या आमदार झाल्या, तर त्यांचे दीर शंकर जगताप यांच्याकडे भाजप शहराध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली. चिंचवडकडे शहराध्यक्षपद गेल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा गट नाराज झाला. यातूनच जगताप यांचा फोटो कोणत्याही कार्यक्रमाच्या फलकांवर नसतो. लांडगे प्रोटोकॉल पाळत नसल्याची तक्रारही पक्षाच्या सचिवाने थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. शहर भाजपमध्ये शहराध्यक्ष जगताप, आमदार लांडगे, आमदार जगताप आणि निष्ठावंत आमदार अमित गोरखे, उमा खापरे यांचा एक गट अशा चार गटांत पक्षाची विभागणी झाली आहे. त्यामुळे पक्षात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. भोसरीचा गट चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांचे पाय ओढण्याची एकही संधी सोडत नाही.
भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी पक्षातील माजी नगरसेवकांचा एक गट कमालीचा सक्रिय झाला आहे. जगताप यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र सुरू झाले आहे. याचा भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.