राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या जेष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहन उलटल्याने चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पाली जिल्ह्यातील रोहत आणि पनिहारी चौकाजवळ हा अपघात झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ बाली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कॅबिनेट मंत्री ओटाराम देवासी यांच्या आईचे निधन झाल्याने वसुंधरा राजे सांत्वनपर भेट घेण्यासाठी पाली जिल्ह्यातील बाली येथे गेल्या होत्या. तेथून परतत असताना एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलिसांची बोलेरो गाडी अनियंत्रित झाली आणि उलटली.
अपघातानंतर वसुंधरा राजे यांनी तातडीने जखमी पोलिसांना ॲम्ब्युलन्समधून बाली रुग्णालयात पाठवले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.