स्मार्टफोनचे कोणते फीचर्स कधी कामी येईल याचा नेम नाही. केरळमधील ट्रफिक पोलिसाला याचा प्रत्यय नुकताच आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगाराला सॅमसंगच्या स्मार्टफोनमुळे जबरदस्त फटका बसला आहे. केरळ मोटार वाहन विभागाच्या ट्रफिक पोलिसाने ट्रफिक नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला पकडण्यासाठी आणि चालान देण्यासाठी हाय डेफिनेशन स्मार्टफोन कॅमेरा वापरला. या कॅमेऱ्याचा वापर करून गुन्हेगाराच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो घेण्यात आला. त्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. सॅमसंग कंपनीचा सॅमसंग एस24 अल्ट्रा हा फोन सध्या दूरवरचे फोटो घेण्यासाठी चर्चेत आहे. सोशल मीडियावरसुद्धा या फोनचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. या फोनने झूम करून कितीही लांबचा फोटो एकदम क्लिअर दिसतो. त्यामुळे पोलिसांसोबत चलाखी करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यात याच फोनचा वापर केरळ पोलिसांनी केला आहे.
नेमके काय घडले
केरळमध्ये मोटरसायकल चालवणारा आणि त्याच्यामागे बसणारा अशा दोघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. परंतु या प्रकरणात व्हायरल झालेल्या घटनेत रॉयल एनफिल्ड मोटारचालक एका व्यक्तीसोबत प्रवास करत असून चालकाने हेल्मेट घातले आहे. परंतु मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी दंड आकारू नये यासाठी मागे बसलेल्या व्यक्तीने गाडीची नंबर प्लेट हाताने लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांपासून दूर गेल्यानंतर नंबर प्लेटवरील हात काढला. परंतु पोलिसांनी दूर गेल्यानंतर फोनच्या मदतीने गाडीचा नंबर कॅमेऱ्यात कैद केला.