
हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करणाऱ्या महायुती सरकारच्या हिंदूद्वेषाचा बुरखा शिवसेनेने फाडला. वाळकेश्वर-बाणगंगा येथील जब्रेश्वर महादेव मंदिरात आरती करणाऱ्या मराठी बांधवांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली. अमराठी लोकांच्या तक्रारीवरून भूमिपुत्रांचा आवाज दाबण्याच्या या सरकारी कारस्थानाचा निषेध करीत सोमवारी शिवसेनेने जब्रेश्वर महादेव मंदिरात महाआरती केली आणि आरती करणाऱ्यांवर कारवाई केल्यास खपवून घेणार नाही, असा रोखठोक इशारा महायुती सरकारला दिला.
वाळकेश्वर बाणगंगा परिसराला लागूनच जब्रेश्वर महादेव मंदिर आहे. 1840मध्ये स्थापना केलेल्या या मंदिरात दर सोमवारी रात्री 9 ते 9.30 या वेळेत नगाडा व शंखाच्या नादात आरती केली जाते. कित्येक वर्षांपासून आरतीची परंपरा जपली जात आहे. असे असताना परिसरात नव्याने उभारलेल्या गृहनिर्माण संकुलांतील अमराठी कुटुंबीयांनी पारंपरिक आरतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरू करीत आरती करणाऱ्या मराठी बांधवांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. दक्षिण मुंबईतील भूमिपुत्र मराठी कुटुंबांचा आवाज दाबण्याच्या महायुती सरकारच्या या कारस्थानाविरोधात शिवसेना आक्रमक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सोमवारी जब्रेश्वर महादेव मंदिरात धाव घेतली आणि महाआरती केली. या माध्यमातून दर सोमवारी महादेव मंदिरात आरती करणाऱ्या स्थानिक मराठी रहिवाशांना शिवसेनेने पाठिंबा दिला. आरती करणाऱ्यांवर पोलिसांनी कुठल्याही प्रकारे कारवाई केल्यास आपण खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसैनिकांतर्फे सरकारला देण्यात आला आहे.
भूमिपुत्रांनी अपमान का सहन करायचा?
पोलिसांच्या कारवाईविरोधात स्थानिक मराठी कुटुंबांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आमच्या भूमीत आम्ही अपमान का सहन करायचा? आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. आमच्या देवाची आरती आम्ही का करू नये? एकीकडे मोठय़ा आवाजात भोंगे वाजतात. तो आवाज सर्वधर्मीय लोक ऐकतात. हिंदुत्वाची भाषा करणारे सरकार मराठी कुटुंबांवर कारवाईसाठी कसेकाय सक्रिय होतेय? आरती करायला गर्दी होत असल्याचे कारण दिले जाते. मग महापुंभवर कारवाई का केली नाही, असे संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.