
गेल्या वर्षी झालेल्या नीट-यूजीच्या पेपरफुटी प्रकरणावरून धडा घेत यंदा गैरप्रकार रोखण्याकरिता पोलिसांच्या सुरक्षेत प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे परीक्षा केंद्रांवर पोचवले जाणार आहेत.
4 मे रोजी 550हून अधिक शहरांमध्ये आणि देशभरातील 5 हजारांहून अधिक केंद्रांवर ही परीक्षा होईल. गेल्या वर्षीच्या पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप झाला होता. यंदा हे प्रकार टाळण्यारिता कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरीय समन्वय समित्या सक्रिय केल्या जात आहेत.
यात प्रश्नपत्रिका आणि ओएमआर शीट्ससारख्या गोपनीय साहित्याची वाहतूक पूर्ण पोलीस संरक्षणाखाली केली जाईल. कोचिंग सेंटर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही देखरेख ठेवली जाणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर तपासणीसाठी सरकारी अधिकारी तैनात असतील. पोलीस अधिकारीही केंद्रांना भेटी देऊन पाहणी करतील.