एसआयटीच्या पथकातून ‘आका’च्या जिगरींची हकालपट्टी!

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटी पथकामध्ये वाल्मीक कराडच्या जीवश्च कंठश्च मित्रांचा समावेश करण्यात आला होता. यावरून टीकेची झोड उडताच पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि मनोज वाघ यांची एसआयटीच्या पथकातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी दहा जणांचे एसआयटी पथक नेमण्यात आले आहे. या पथकात संकेताची पायमल्ली करून पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि हवालदार मनोज वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीची घोषणा होताच महेश विघ्ने यांची वाल्मीक कराडसोबतची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे महेश विघ्ने विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते म्हणूनच वावरत असल्याचेही समोर आले. त्यामुळे संतोष देशमुख यांना कसा न्याय मिळणार, असा संतप्त सवाल बीडकरांनी उपस्थित केला. आज या दोघांनाही एसआयटीच्या पथकातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

खासदारांबद्दल वायफळ लिहिणाऱ्या गणेश मुंडेंची पुण्यात रवानगी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे खासदार बजरंग सोनवणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह तसेच वायफळ पोस्ट लिहिणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची तडकाफडकी पुणे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.