मुलगी आणि जावयाने दारुड्या बापाची हत्या करुन मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना गोंदियात उघडकीस आली आहे. बापाची हत्या केल्यानंतर मुलगी आणि जावयाने कारमधून मृतदेह मध्य प्रदेशात नेला. तेथे बंद ढाब्याच्या बाथरुममध्ये मृतदेह जाळला आणि पलायन केले. मात्र पोलिसांनी कसून तपास करत हत्येचे गूढ उकलले. याप्रकरणी पोलिसांनी मुलगी आणि जावयाला अटक केली आहे. पुरुषोत्तम कावळे असे मयत व्यक्तीचे नाव असून, तो संगीत शिक्षक होता.
बैतूलमधील चिंचडा राष्ट्रीय महामार्गावर 15 फेब्रुवारी रोजी जळालेला मृतदेह सापडला होता. मध्य प्रदेश पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला. मयत इसमाचे केस लांब होते, बोटात अंगठी होती. याच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यावेळी त्यांना एका पेट्रोल पंपावर एक सफेद रंगाची संशयित कार दिसली.
पोलिसांनी कारच्या नंबरप्लेटवरून गाडीचा तपास सुरू केला. तपासात ही गाडी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील किरण कावळे या महिलेच्या नावे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यात दाखल होत मयत इसमाबाबत पुढील तपास सुरू केला. तेथे चौकशी केली असता किरण कावळे हिच्या पतीचे केस लांब आहेत आणि तो संगीत शिक्षक आहे. मात्र चार महिन्यांपासून त्यांचे कुटुंब बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी किरणचा शोध घेत चौकशी केली असता मृतदेहाचे वर्णन आपल्या पतीशी जुळते. मात्र तो चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगितले. पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून ती मुलीच्या घरी राहत होती. मात्र 13 फेब्रुवारी रोजी मुलगी वडिलांना भेटायला गेल्याचे किरणने पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी किरणची मुलगी आणि जावयाची कसून चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.
बाप-बेटीचा वाद झाला. मग दोघांमध्ये झटापट आणि मारहाण झाली. यात पित्याचा मृत्यू झाला. यानंतर दोघा पती-पत्नीने मृतदेह कारमध्ये टाकून मध्य प्रदेशात नेऊन एका ढाब्यावर जाळल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.