
विकट गडावर (पेब किल्ला) अडकून पडलेल्या सात पर्यटकांची नेरळ पोलीस आणि आपत्कालीन सामाजिक संस्थांनी नऊ तासांनी सुटका केली. हे पर्यटक ट्रेकिंगसाठी या किल्ल्यावर आले होते. त्यांच्यापैकी एका तरुणीला उन्हाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मुंबई पवई आणि परिसरात राहणारे तेजस ठाकरे, निकिता जॉबे, हिबा फातिमा, निखिल सिंग, सोनू साहू, चेतन पाटील, साहिल लेले असा सात जणांचा कॉलेज ग्रुप माथेरानजवळील पेब किल्ला गड सर करण्याच्या हेतूने आला होता. पायवाटेने या तरुणांनी पेब किल्ला चढण्यास सुरुवात केली. ते काही अंतर पुढे चालून गेले असता रस्ता चुकले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना रस्ता चुकल्याचे सांगून मार्गदर्शनही केले. त्यानंतरही ते पुन्हा रस्ता चुकले. त्याचवेळी एका तरुणीला उन्हाचा त्रास झाला. भोवळ आल्याने ती जागेवरच बसली. त्यानंतर या तरुणांनी 112 या हेल्पलाईन क्रमांकावर मदत मागितली. त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी माथेरान येथील सह्याद्री टीम आणि नेरळ ममदापूर वाडी येथील तरुणांना मदतीसाठी पाठवले. त्यानंतर अडकलेल्या या तरुणांची सुटका करण्यात आली.
कुटुंबियांची धावाधाव
हे तरुण पेब किल्ल्यावर अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची धावाधाव सुरू झाली. सर्वच तरुणांचे कुटुंबीय माथेरानमध्ये आले. बचाव पथकाने या अडकलेल्या तरुणांना फणसवाडी मार्गाने गडाखाली सुखरूप आणले. सायंकाळी 6 वाजता या तरुणांना नेरळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.