सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत पोलीसभरतीची प्रक्रिया आजपासून (दि. 19) सुरू होत आहे. पोलीस शिपाईपदासाठी 196 क पोलीस चालकपदासाठी 39 अशा प्रकारे 235 पदांच्या भरतीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, पोलीसभरतीसाठी कोणीही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
पोलीस कवायत मैदान येथे संपूर्ण पोलीसभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. साधारण आठ दिवसांमध्ये भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पोलीसभरती प्रक्रियेदरम्यान पावसाची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. मात्र, पोलीस प्रशासन त्याबाबत सतर्क असून, मैदानी चाचणीसाठी मैदान चांगले राहावे, याबाबतची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. उमेदवारांनी कोणतीही खोटी, बनावट कागदपत्रे जोडू नयेत, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी केले आहे.
दरम्यान, नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजल्यापासून उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. आत आल्यानंतर कागदपत्रांची छाननी करण्यासाठी टेबल लावण्यात येणार आहेत. मैदानी चाचणीनंतर लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी दिली.