
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात राहणारे सातपुते दांपत्य वाशी येथे कार्यक्रम आटपून माघारी निघाले होते. पण प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने व महागडा मोबाईल असा नऊ लाख 65 हजार किमतीचा ऐवज ठेवलेली पर्स सातपुते यांच्या पत्नी रिक्षातच विसरल्या. हे लक्षात येताच सातपुते यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार सांगितला. त्यानंतर सपोनि. मोरकाने, उपनिरीक्षक शरद नाणेकर, मनोज ठाकूर तसेच संजय आव्हाड, प्रमोद लेभे, दशरथ राणे, प्रदीप देशमुख व मोनिका निकाळजे या पथकाने त्या रिक्षाचा शोध सुरू केला. सातपुते राहतात त्या इमारतीच्या मुख्य गेटवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रिक्षाचा नंबर मिळाला. मग त्यावरून रिक्षाच्या मालकाचा नंबर काढला. त्याचे लोकेशन घेतले असता तो रिक्षासह चकाला मेट्रो स्थानकाजवळ मिळाला. रिक्षाच्या डिक्कीमध्ये सातपुते यांच्या पत्नीची पर्स मिळाली.