मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पदच असल्याची पुष्टी करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि हत्या प्रकरणातील एक आरोपी सुदर्शन घुले हे 8 डिसेंबर रोजी एका हॉटेलात भेटले आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अमानुष हत्या झाली. आरोपी आणि पोलीस निरीक्षक यांच्यात नेमके काय शिजले याबाबत सीआयडी तपास करणार का, असा सवाल करण्यात येत आहे.
संतोष देशमुख हत्याकांडाच्या घटनेने राज्य ढवळून निघाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. मात्र चार आरोपी अजूनही राजकीय संरक्षणात सुरक्षित असल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांना अटक करण्याची मागणी होत आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन करून सरकारने या प्रकरणातून तात्पुरती मान सोडवून घेतली आहे.
वसंत विहार हॉटेलात काय शिजले?
संतोष देशमुख यांची हत्या घडली त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.18 मिनिटांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सुदर्शन घुले हे दोघे वसंत विहार उडुपी हॉटेलात भेटले. दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. त्यानंतर दुसऱयाच दिवशी 9 डिसेंबर रोजी दुपारी संतोष देशमुख यांची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली. राजेश पाटील आणि सुदर्शन घुले यांच्यात नेमके काय शिजले? पाटील यांना या कटाची माहिती होती का? असे प्रश्न या भेटीच्या व्हायरल व्हिडीओने निर्माण केले आहेत.
एसआयटी नको, न्यायालयीन चौकशी करा, रोहित पवार यांची मागणी
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सरकारने एसआयटी नेमून चटावरचे श्राद्ध उरकले आहे. एसआयटी नेमून न्याय मिळणार नाही, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपण कोणत्याही मंत्र्याचे नाव घेत नसून खंडणीखोर वाल्मीक कराड याला अटक करण्यात यावी कारण या प्रकरणात त्याचेच नाव येत असल्याचा आरोपही आमदार पवार यांनी केला.