बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर पुन्हा बेछूट लाठीचार्ज! आंदोलकांना अश्रू अनावर; मुख्यमंत्र्यांनी गाठली दिल्ली

बिहार लोकसेवा आयोगाची 70वी पूर्व परीक्षा पूर्ण रद्द करावी यासाठी पाटणा येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. जनसुराजच्या प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पुन्हा बेछुट लाठीचार्ज केला. येथील गांधी मैदानावर मोठया संख्येने विद्यार्थी जमले होते. यासाठी प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. मात्र, पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले.

पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. अनेक आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ’नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारला धडा शिकवण्यासाठी मोठी लढाई लढावी लागेल. विद्यार्थ्यांना घाबरून मुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठली’, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.

परीक्षा रद्द करण्याची मागणी

दरम्यान, 13 डिसेंबर 2024 रोजी बिहारमधील 912 केंद्रांवर बीपीएससीची परीक्षा झाली. पाटण्यातील बापू परीक्षा केंद्रावर पेपरफुटीच्या कारणावरून गोंधळ झाला होता. त्यानंतर आयोगाने या पेंद्राची परीक्षा रद्द केली. 4 जानेवारी रोजी या केंद्रावर पुन्हा परीक्षा घेण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. मात्र, संपूर्ण राज्यातील परीक्षा पुन्हा व्हावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.