पूजा खेडकरच्या बाणेर येथील घरावर पोलिसांचा वॉच; दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला

नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी व अपंग कोट्यातील लाभाचा गैरवापर केल्या प्रकरणी आयएएस पूजा खेडकरविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी फौजदारी खटल्यात अटकपूर्व जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून तिच्या बाणेर येथील घरावर पोलिसांकडून ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे.

निलंबित अधिकारी पूजा खेडकरवर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा – 2022मध्ये अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो फेटाळण्यात आला. मात्र पोलीस पूजा खेडकर हिच्या बाणेर येथील घरी जाऊन आल्याची माहिती आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन याचिका नामंजूर केली आहे. यूपीएससी ही प्रतिष्ठत परीक्षा मानली जाते. ही केवळ संस्थेविरुद्धच नव्हे, तर समाजाविरुद्ध फसवणूक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाने पूजाची अटकपूर्व याचिका फेटाळल्याचा निर्णय देऊन अंतरिम संरक्षण काढून घेतले. अशा परिस्थितीत कटाच्या तपासासाठी चौकशीची आवश्यकता आहे. घटनात्मक संस्थेबरोबरच समाजाचीदेखील फसवणूक केल्याचे हे एक अनोखे प्रकरण आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.