संगमनेर दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण, 240 कोटींचे नेमके कनेक्शन काय? आरोपींना मिळणार होते कमिशन

दूधगंगा पतसंस्थेत 81 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आणि त्याचे उद्योग चर्चेत असतानाच आता छत्रपती संभाजीनगर येथील चेतन नागराज कपाटे ऊर्फ सुदर्शन बाबा याच्या ‘श्रीकृष्ण आश्रम ट्रस्ट’ला 240 कोटी रुपये देणगी देण्याचा उद्योग आरोपींनी सुरू केला होता, अशी माहिती समोर आली असून, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्या दृष्टीने तपास करीत आहे. दरम्यान, जामीन फेटाळल्यामुळे आरोपी चेतन नागराज कपाटे ऊर्फ सुदर्शन बाबा अनेक महिन्यांपासून फरारी असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सर्वसामान्यांच्या 81 कोटींच्या ठेवी लंपास करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी या आरोपींनी पतसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे आर्थिक गुन्हे करण्याचा सपाटा लावला असल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही आरोपींना जामीन मिळाला आहे, तर काहीजण फरारी असून, काहीजण तुरुंगात आहेत. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा उपचारांच्या नावाखाली नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आराम करीत आहे.

घोटाळ्यातील आरोपी चेतन नागराज कपाटे हा दूधगंगा पतसंस्थेचा सभासद अगर खातेदार नसतानाही पतसंस्थेमधून आरोपींनी त्याच्या खात्यावर व्यवहार केले आहेत आणि काही रकमादेखील स्वीकारल्या आहेत. या रकमा लाखो रुपयांमध्ये आहेत. कपाटे ऊर्फ सुदर्शन बाबा याच्या नावाने आरोपींनी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 9345 या नंबरचे बचत खाते उघडले आहे. हे खाते उघडण्यासाठी कपाटे याचा अर्ज किंवा ‘केवायसी’ कागदपत्रे घेण्यात आलेली नाहीत. तसेच खाते उघडून त्यावरील व्यवहार खातेदाराच्या सहीशिवाय केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे लाखो रुपयांचे व्यवहार आरोपींनी संगनमताने केले आहेत की नाहीत? आणि ते कोणासाठी केले आहेत? त्याचा लाभ कोणाला मिळाला आणि कोणाला मिळणार होता? याचा तपास पोलीस करीत होते.

आश्रमाला देणगीसाठी करारनामा

दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपींनी चेतन नागराज कपाटे ऊर्फ सुदर्शन महाराज याच्या श्रीकृष्ण आश्रम ट्रस्टला 240 कोटी रुपयांची देणगी मिळवून देण्याकरिता नोटरी करारनामा केल्याचे उघड झाले आहे. त्यापोटी काही मोठ्या रकमांचे धनादेश देण्यात आले आहेत. हे धनादेश संबंधित आरोपींना कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या बदल्यात कमिशन म्हणून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये लाखो रुपयांचे व्यवहार आरोपींमध्ये झाले असून, बँकांमधून एकमेकांच्या नावावर पैसे ट्रान्स्फर झाले आहेत. त्यामुळे आता या 240 कोटी रुपयांच्या देणगी व्यवहाराबाबतचे रहस्य नेमके काय? याचा तपास पोलीस करीत आहेत.