
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. हितेश मेहताने ट्रस्टमध्ये रोख रक्कम भरली होती. त्या ट्रस्टच्या खात्यावर त्यापेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्यासाठी दोन ट्रस्टला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच अपहार झालेल्या रकमेपैकी काही रक्कम हवालामार्फत बाहेर पाठवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ज्या दोन ट्रस्टला रक्कम दिली, त्या ट्रस्टचा पोलीस शोध घेत आहेत.
न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी तपास करून एकूण रकमेपैकी आतापर्यंत 2 लाख 8 हजार रक्कम हस्तगत केली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात नुकतेच बँकेच्या सीईओलादेखील अटक केली आहे. अटक केलेल्या त्या सीईओला बँकेतील कॅश इन हॅण्डची माहिती होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये बँकेचे पॅश इन हॅण्डची मर्यादा ही दहा कोटी होती. त्यानंतर ती मर्यादा 20 कोटी करण्यात आली. तसेच मार्च 2019 मध्ये 33 कोटी, मार्च 2020 मध्ये 99 कोटी कॅश इन हॅण्ड ठेवली होती, तर अपहार झालेल्या रकमेपैकी काही रक्कम ही हवालामार्फत बाहेर पाठवल्याची माहिती तपास पथकाला मिळाली आहे. ती हवालामार्फत कोणाला दिली याचा तपास केला जात आहे.
हितेश मेहताने ट्रस्टमध्ये रोख रक्कम भरली होती. त्या ट्रस्टच्या खात्यातून खात्यावर त्यापेक्षा अधिक रक्कम स्वीकारण्यासाठी दोन ट्रस्टला मोठ्या प्रमाणात रक्कम दिली होती. ज्या दोन ट्रस्टला रक्कम दिली गेली त्या नेमक्या कोणत्या ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टमध्ये कोण पदाधिकारी आहेत, ती ट्रस्ट सरकार मान्य आहेत का, याची माहिती पोलीस काढत आहेत. पोलिसांनी त्या तिघांना ट्रस्टबाबत माहिती विचारली असता ते टाळाटाळ करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.