17 कोटींचे एमडी जप्त; 7 तस्करांची धरपकड, मीरा-भाईंदर पोलिसाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी

नयानगर पोलीस ठाण्यात काम करणारा पोलीस हवालदार याच्या शेतात चालवल्या जात असलेल्या ड्रग्जच्या फॅक्टरीतून मेफेड्रोन या घातक अमली पदार्थाचा 11.36 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जची किंमत सुमारे 17कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे याच्यासह 7 तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामधील रोहिणा गावाच्या शिवारात डोंगराळ भागामध्ये पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे याची शेती आहे. याच शेतीत तो आणि त्याचे सहकारी गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थ तयार करण्याची ही फॅक्टरी चालवत होते. ही माहिती महसूल गुप्तचर यंत्रणेला मिळाल्यानंतर या फॅक्टरीवर छापा मारण्यात आला. त्यावेळी फॅक्टरीमध्ये 11.36 किलो मेफेड्रोन आढळून आले. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 17 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ड्रग्ज बनवण्यासाठी फॅक्टरीत असलेला कच्चा माल आणि लॅब सेटअपही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात डीआरआयने सातजणांना अटक केली आहे.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
डीआयआरने अटक केलेल्या सर्वच सातही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अटक आरोपींमध्ये पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे, मोहम्मद शेख, जुबेर मापकर, आहाद मेमन, अहमद खान आदींचा समावेश आहे. या ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये मीरा-भाईंदर व मुंबई परिसरात 30 ते 35 पोलीसवाले असल्याची चर्चा सुरू आहेत. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचे नावही आता पुढे येऊ लागले आहे.