ई वॉलेटवरून मुलीच्या आईला शोधले

दीड वर्षाच्या मुलीला बोरिवली रेल्वे स्थानकात सोडून गेल्याप्रकरणी एका महिलेला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही आणि ई वॉलेटवरून पोलीस त्या मुलीच्या आईपर्यंत पोहचले. तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

4 सप्टेंबरला बोरिवली रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 येथे पोलिसांना एक दीड वर्षाची मुलगी दिसून आली. पोलिसांनी मुलीच्या पालकांचा शोध घेतला. मात्र पालक मिळून न आल्याने तिला आश्रमात ठेवले. पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक दत्ता खुपेकर यांच्या पथकातील पोलीस शिपाई अश्विनी धापसे यांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ती मुलगी फुलविव्रेत्याची असावी, असा पोलिसांनी अंदाज बांधला. एका फुटेजमध्ये महिला ही मुलाला फलाटावर सोडून जात असल्याचे दिसले. त्यानंतर ती महिला फलाट क्रमांक 3 वर दुसरी लोकल पकडत होती. त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी काही फुटेज शेअर केले होते. मूळची बिहारची रहिवासी असलेली महिला भाईंदर येथे राहते. ती मुंबईत एकटीच राहते. घटनेच्या दिवशी ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आली. तेथून रिक्षा पकडून ती खार रेल्वे स्थानकात आली. खारला जाण्यासाठी 700 रुपये भाडे होते. मात्र महिलेकडे फक्त 200 रुपये होते. उर्वरित पैसे ई वॉलेटने देते असे तिने रिक्षा चालकाला सांगितले. तिने एका रिक्षा चालकाला नंबर दिला. त्या रिक्षा चालकाने त्या नंबरवर फोन करून खात्री केली.

तपासा दरम्यान पोलिसांना एक महिला भाईंदर येथे उतरत असल्याचे दिसले. मात्र तिचा स्पष्ट चेहरा दिसत नव्हता. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे पथक अपहरणाच्या गुह्याचा तपास करत होते. त्या गुह्याच्या तपासा दरम्यान एका रिक्षा चालकाची माहिती मिळाली. त्या रिक्षा चालकाची चौकशी केल्यावर पोलिसांना महिलेचा नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांनी भाईंदर येथून महिलेला ताब्यात घेऊन तिला बोरिवली रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. महिलेला अटक करून न्यायालयात हजर केले होते. ती महिला काही सांगण्याच्या मानसिकतेत नाही. गावी गेल्यावर तिच्या परिचित असणाऱ्याने तिला मुलाबाबत विचारणा केली. तेव्हा तिने ते मूल आईकडे सोडून आल्याचे सांगितले होते.