दहशत पसरवण्यासाठीच बाबा सिद्दिकी यांची हत्या! पोलिसांकडून साडेचार हजार पानांचे आरोपपत्र दाखल

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 4590 पानांचे आरोपपत्र दाखल केले. बाबा सिद्धिकी यांची हत्या लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने दहशत पसरवण्यासाठीच केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, समाजात भीती आणि वर्चस्व निर्माण करण्यासाठी या हत्येचा कट रचण्यात आल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात दाखल केले आहे.

12 ऑक्टोबर रोजी निर्मल नगर परिसरात सिद्दिकी यांच्यावर सहा गोळय़ा झाडण्यात आल्या. त्यापैकी दोन त्यांना लागल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि लीलावती रुग्णालयात उपचार मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून दोन हल्लेखोरांना अटक केली; तर पुणे, अकोला, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब येथून इतर आरोपींची धरपकड करण्यात आली. सिद्दिकी यांच्यावर गोळय़ा झाडणारा शूटर शिवकुमार गौतम याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. एकूण 26 आरोपींना अटक करण्यात आली असून कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल, शुभम लोणकर आणि जिशान अख्तर या तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपपत्राचा हवाला देणाऱया या अहवालात अभिनेता सलमान खानशी असलेली बाबा सिद्दिकी यांची जवळीक तसेच अनुज थापनच्या आत्महत्येचा बदला ही गुह्याची इतर कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 200 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवलेत.

कबुलीजबाब जबरदस्तीने नोंदवला

आरोपी गुरमेल सिंग आणि हरीशकुमार कश्यप यांनी दावा केला आहे की, पोलिसांनी घेतलेला कबुलीजबाब आपण स्वेच्छेने दिलेला नाही. केवळ सध्याच्या आरोपींना आणि इतर आरोपींना या खोटय़ा प्रकरणात अडकवण्यासाठी तो रेकॉर्ड करण्यात आला आहे.