सहकाऱ्यांनो, ऑनड्युटी असताना नाचू नका! वरिष्ठांच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना

प्रातिनिधिक फोटो

गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र प्रसन्नतेचे वातावरण आहे. हा सण सर्वांना आनंदात आणि भक्तिभावात साजरा करता यावा याकरिता मुंबईचे पोलीस अहोरात्र खडापहारा देत आहेत. नागरिकांचे सुरक्षा कवच असलेल्या या पोलिसांना आता वरिष्ठांकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत. आपले शिस्तीचे दल आहे. तेव्हा ऑनड्युटी असताना कुठेही नाचू नका असे सांगण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सवात भक्तांच्या आनंदाला पारावार उरत नाही. बाप्पाचा आगमन सोहळा असो, मंडपात आयोजित केलेले सांस्पृतिक कार्यक्रम अथवा विसर्जन मिरवणूक, प्रत्येकाचे पाय थिरकल्याशिवाय राहत नाही. असे असले तरी पोलिसांना यामध्ये सहभागी होऊन  नृत्य वगैरे करता येत नाही. पोलीस दल हे शिस्तीचे दल असून  काही नियमावली आखून दिलेली आहे. त्यामुळे वर्दीत असताना अथवा साध्या कपड्यांवर पण ऑनड्युटी असताना पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नाचणे अयोग्य आहे. त्याचीच आठवण वरिष्ठांकडून करून देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ऑनड्युटी असताना नाचू नये, अशी सूचना पोलीस आयुक्तांनी केली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.