![dawood](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/08/daud-696x447.jpg)
>> प्रभाकर पवार
दक्षिण मुंबईतील कर्नाक बंदर पुलावर 17 सप्टेंबर 2016 रोजी मुकेश संघवी हा सराफ आपल्या सहकाऱ्यांसह सोन्याचे दागिने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने घेऊन जात असताना एका टोळीने वाहतूककोंडीचा फायदा घेऊन त्यांची टॅक्सी अडवली व शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून 1 कोटी 87 लाख रुपये किमतीचे दागिने पळवून नेले. ही घटना घडली तेव्हा दत्ता पडसलगीकर हे मुंबईचे आयुक्त, तर संजय सक्सेना हे मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त होते. पायधुनी पोलीस ठाण्यातील हद्दीत हा गुन्हा घडला होता. परंतु त्याचा तपास पोलीस आयुक्त पडसलगीकर यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविला. मुंबई क्राईम बँचच्या प्रशांत राजे, संजय निकम आदी अधिकाऱ्यांनी या रॉबरी केसचा कसून तपास करून चार जणांच्या एका टोळीला महिनाभरात अटक केली. त्यात एका टॅक्सी चालकाचाही समावेश आहे. टॅक्सी चालकाने लघुशंकेसाठी गाडी अचानक रस्त्यात थांबविली. त्या वेळी अगोदरच दबा धरून बसलेल्या शस्त्रधारी टोळीने टॅक्सीतील सराफाला धमकावून त्याच्याकडील दागिने पळविले व सोबत असलेल्या सराफाच्या पुतण्याचेही अपहरण केले या गुन्ह्यात भाग घेणाऱ्या प्रफुल्ल रामचंद्र गायकवाड, शहानवाज बहुद्दीन खान, जहांगीर अब्दुल मलिक शेख आणि रतनकुमार ध्याननाथ सिंग या चार आरोपीविरुद्ध पोलिसांनी ठोस पुरावे न्यायालयात सादर केल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांनी गेल्या आठवड्यात चार आरोपींना १० वर्षांची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे कर्नाक बंदर पुलावर असाच एक दरोडा ५० वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिम कासकर आणि त्यांच्या साथीदारांनी प्लॅन केला होता व तो देशभरात गाजला होता. एम. जी. मुगवे हे त्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त होते.
4 डिसेंबर 1974 चा तो दिवस होता. दुपारची वेळ होती. कर्नाक ब्रिजला समांतर असलेल्या रोकडे रोडवरून कांतीलाल जैन हे चेक डिपॉझिट करून बँकेतून वटवलेली रोख रक्कम आपल्या कार्यालयात घेऊन जात असताना त्यांच्या मोटारीच्या समोर एक ट्रक आला व संथगतीने चालू लागला नाइलाजाने जैन यांच्या कार चालकाला गाडी ट्रकच्या मागे ठेवावी लागली. त्याच वेळी 20- 21 वर्षांचा शरीरयष्टीने मजबूत असलेला एक तरुण कांतीलाल जैन यांच्या गाडीच्या समोर येऊन उभा राहिला. तेव्हा कांतीलाल जैन यांचा ड्रायव्हर म्हणाला, “अरे तुमको मरने का है क्या? चलो बाजू हटो ” परंतु तो तरुण बाजूला झाला नाही. उलट आणखी एक तरुण कांतीलाल जैन यांच्या दिशेने पुढे आला. त्याने दरवाजा उघडून कांतीलाल जैन यांच्या गळ्यावर एक धारदार सुरा ठेवून त्यांच्याकडील मोटारीच्या चाव्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या. डीकी उघडून त्यातील पैशांच्या बॅगा बाहेर काढल्या. त्यानंतर कांतीलाल जैन व त्यांच्या पुतण्याच्या अंगावर असलेली रोख रक्कम अशा मिळून 3 लाख 75 हजार रुपयांच्या करकरीत नोटा पळवून नेल्या सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या मालमत्तेचे २० कोटी रुपये मूल्य असायला हवे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या व जगात नावलौकिक असलेल्या क्राईम बॅचच्या कार्यालयासमोरच हा दरोडा घालण्यात आल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इतका मोठा दरोडा कधी मुंबई शहरात पडला नव्हता.
त्या वेळी विनायक वाकटकर सुरेश पेंडसे ही नावाजलेली कर्तबगार जोडी मुंबई क्राईम बँचमध्ये कार्यरत होती. त्यांच्या नावाचा गुंड टोळ्यांमध्ये दबदबा होता. त्यांनी या तपासाची सूत्र हाती घेतली. ता. बा. गौड, सावंत, देशमुख यांनी हैदराबाद सीआयडीच्या स्पेशल टीमचे अधिकारी प्रकाश राव, व्यंकटेश रेड्डी यांच्या मदतीने तपास सुरू केला. रात्री भांडुपच्या गावदेवी रोडवरील सलीम हाऊसवर छापा मारून शरीरयष्टीने मजबूत असलेला विशीतील दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदाराला अटक केली. दाऊदविरुद्ध दाखल झालेला हा पहिला गुन्हा व अटक होय. त्यानंतर दाऊदविरुद्ध शेकडो गुन्हे दाखल झाले, परंतु गेल्या ५० वर्षांत त्याला कधी अटक झाली नाही.
भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यात मोटारींवर घातलेल्या दरोड्याच्या या केसचे २ मे १९७९ रोजी निकालपत्र जाहीर झाले. दाऊदला ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा मुंबईचे अॅडिशनल सेशन्स जज आर. व्ही. जोशी यांनी ठोठावली. तेव्हा दाऊद शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात गेला, परंतु उच्च न्यायालयाने त्याचे अपील फेटाळले तेव्हापासून म्हणजे गेली ५० वर्षे दाऊद फरार आहे. पाकिस्तानने त्याला आश्रय दिला आहे. तो आयएसआयसाठी काम करतो. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या या अंडरवर्ल्ड डॉनविरुद्ध मुंबईसह देशभरात दोनशेच्या वर गुन्हे दाखल आहेत. त्याला अमेरिकेने मोस्ट वॉन्टेड अतिरेकी म्हणून (ग्लोबल टेररिस्ट) घोषित केले आहे. कर्नाक ब्रिजवर दरोडा घालणारा एकेकाळचा हा फुटकळ गुन्हेगार आज कराचीतील आपल्या बिलियर्ड टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल आदी सुविधा असलेल्या आलिशान बंगल्यात आपल्या पत्नी व मुलांसह सुखेनैव जीवन जगत आहे. तरीही त्याला अधूनमधून भारतामध्ये यावे असे वाटते, परंतु आता ती वेळ टळून गेली आहे. दरोड्यापासून ते बॉम्बस्फोट मालिका घडविणारा दाऊद आता मुंबई पोलिसांनाही नको आहे. कारण दाऊदकडे बरीच गोपनीय माहिती दडलेली आहे. त्याचा स्फोट झाला तर राजकारणी अडचणीत येतील. भारतात येऊन दाऊदला वाल्याच्या वाल्मीकी व्हायचे होते असे त्याचे निकटवर्तीय सांगत होते, परंतु बॉम्बस्फोट आरोपी याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर दाऊदने आपला निर्णय बदलला तेव्हा दाऊदचा अंत आता कराचीतच असे दिसून येते.