
>> प्रभाकर पवार
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार, दि. 18 मार्च रोजी नागपूर शहरात औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी दुपारी मोर्चा काढला होता. त्या वेळी कार्यकर्त्यांनी कुराणातील ‘आयत’ लिहिलेली एक चादर जाळली हे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. आयत लिहिलेली चादर जाळणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यासाठी मुस्लिमांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. परंतु सूर्य मावळला तरी गणेशपेठ पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मुसलमानांनी दंगलीला सुरुवात केली. क्षणात जुने नागपूर शहर पेटले मोमीनपुरा, भालदारपुरा विभागात मोठ्या प्रमाणात जाळपोळ सुरू झाली. कोणतीही पूर्वतयारी नसलेल्या दंडुकेधारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. समाजकंटकांनी पोलिसांवरही हल्ले सुरू केले. त्यात उपायुक्तांसह ३३ पोलीस जखमी झाले. एका पोलीस महिलेचाही विनयभंग करण्यात आला. पोलिसांनी दंगलप्रकरणी शंभराच्या वर समाजकंटकांना अटक केली, परंतु त्याआधी नागपूर शहरात ‘न भूतो’ अशी वित्तहानी झाली होती. हिंसाचारात गंभीर जखमी झालेल्या इरफान अन्सारी (37) याचा मृत्यू झाला. नागपुरातील महाल परिसरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. हे नुकसान आपण दंगलखोरांकडून वसूल करू, त्यांची संपत्ती जप्त करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगलीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले दंगलखोरांकडून नुकसान वसूल करू, त्यांची मालमत्ता जप्त करू असे प्रत्येक दंगलीनंतर राज्यकर्ते बोलतात, परंतु त्याची कधी अंमलबजावणी होत नाही. 2012 साली मुंबईत मुसलमानांनी आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या मोर्चात दंगलखोरांनी सार्वजनिक मालमत्तेचे 10 कोटी रुपयांचे नुकसान केले होते. मुंबई क्राइम बॅचचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी तसा अहवालही सादर केला होता, परंतु मोर्चाचे आयोजन करणाऱ्या मुस्लिम संघटनेने शासनाला दमडाही दिला नाही. या दंगलीतही महिला पोलिसांचा मोठ्या प्रमाणात विनयभंग करण्यात आला होता. प्रत्येक दंगलीत पोलिसांनाच टार्गेट करण्यात येते. नागपूरच्या दंगलीत उपायुक्त दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांसह 33 पोलीस जखमी झाले. सामान्य नागरिक आयुष्यातून उठले. याला जबाबदार कोण?
नागपुरात ज्यांचे नुकसान झाले ते दोन्ही धर्माच लोक आज ओक्साबोक्शी रडत आहेत. आम्ही आमच्या आयुष्यात इतका विध्वंस कधी बघितला नव्हता असे ते काकुळतीला येऊन सांगत होते तेव्हा पाहणाऱ्यांनाही अश्रू आवरले नाहीत. जातीधर्मावरून दंगली पेटविणाऱ्यांचे कधीच नुकसान होत नाही. ज्यांनी कुराणातील श्लोक लिहिलेली चादर जाळली ते लोक नामानिराळे झाले, परंतु या घटनेचा फायदा समाजकंटकांनी घेतला. नागपूर शहर उद्ध्वस्त केले. होळीदरम्यान कोकणातील राजापूरही पेटविण्याचा प्रयत्न झाला सिंधुदुर्गातील एका मंत्र्याच्या इशाऱ्यावरून मशिदीत काही तरुणांनी घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तेथे कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. तरीही आज संपूर्ण कोकणात जातीय तणाव निर्माण करण्याचे, विशिष्ट जातीधर्माच्या मच्छीमारांना सळो की पळो करून सोडण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. कोकणात त्याचा कधी स्फोट होईल हे सांगता येणार नाही. निवडणुका जिंकूनही राज्यकर्ते सूडबुद्धीने वागत आहेत. राजापूरची दंगल टळली, परंतु नागपूरची वाट लागली आहे. बोलघेवड्या राजकीय नेत्यांना आवरले नाहीतर उद्या या देशाचीच वाट लागायला वेळ लागणार नाही.
दंगलीत सगळेच आपली संस्कृती विसरतात. त्यांच्यात पशुत्व निर्माण होते. दंगल कुणाच्याच फायद्यात पडत नाही. तरीही खासगीत “आपण कसा xx मार दिला. धडा शिकविला” अशी भाषा नेते मंडळी आपल्या समर्थकांसमोर करतात, परंतु सामोपचाराच्या चार गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांना सांगत नाहीत. प्रत्येक जातीय दंगलीत एका तरी राजकीय नेत्याचा सहभाग असतो, परंतु त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. आपल्या देशात प्रत्येक जण आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करीत असतो. जातीधर्माला महत्त्व देत असतो. हे कधी थांबेल असे वाटत नाही आपल्या देशात सतत हिंदू-मुस्लिम दंगे व्हावेत यासाठी पाकिस्तान व बांगलादेशच्या गुप्तचर यंत्रणा काम करीत असतात. 2012 साली मुंबईत दंगल घडविण्यासाठी बांगलादेशी मौलाना कुर्त्याच्या मशिदीत येऊन बसला होता. त्याने म्यानमार प्रकरणावरून आझाद मैदान येथे दंगल घडविली होती. नागपूरमध्येही बजरंग दल व विहिंपने औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे करून मोर्चा काढला. त्यानंतर ‘आयत’ लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली आणि समाजकंटकांना मोकळे रान मिळाले. समाजकंटकांचा आतंक गेल्या 700-800 वर्षापासून सुरू आहे. तरीही हिंदू समाज नष्ट होऊ शकला नाही. मग औरंगजेबाच्या कबरीचे निमित्त कशासाठी?
इतिहासाची पाने चाळली तर आजच्या मुसलमानांचे पूर्वज केव्हा तरी हिंदू होते हे लक्षात ठेवले तर तंटे वाढणार नाहीत. भिवंडीतील 1984, मुंबईतील 1992-93 व अलीकडील 2020 सालातील दिल्लीतील जातीय दंगली आठवल्या तर आजही अंगावर काटा उभा राहतो. या प्रत्येक दंगलीत पोलिसांना टार्गेट करण्यात आले होते. त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. सुदैवाने नागपूरमधील दंगलीत कुणी पोलीस मारला गेला नाही. परंतु त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा राज्यकर्त्यांनी आता गांभीर्याने विचार करायची गरज आहे. जातीधर्माचा व्हायरस रोखला पाहिजे. इतर धर्माचा द्वेष, मत्सर धांबविला पाहिजे. नाहीतर नागपूरप्रमाणे हा देश उद्ध्वस्त व्हायला, त्याचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही. पोलिसांची ढाल करून, त्यांना पुढे करून राज्यकर्ते आणखी किती वर्षे राज्य करणार आहेत? किती निरपराध्यांचे बळी घेणार आहेत? जातीधर्माचा खेळ करू नये. प्रत्येक दंगलीत आज महिला पोलिसांवर अत्याचार केले जात आहेत याचे राज्यकर्त्यांना अजिबात गांभीर्य वाटत नाही, याचेही आश्चर्य वाटते।