डिजिटल अटकेची भीती दाखवून आपल्या देशवासीयांकडून परदेशी भामटे रोज लाखो, करोडो रुपये कसे उकळत आहेत यावर गेल्या आठवडय़ात याच स्तंभातून प्रकाश टाकण्यात आला होता, परंतु डिजिटल अरेस्ट हे थोतांड आहे. अशी कोणतीच व्यवस्था आपल्या देशात अस्तित्वात नाही. ऑडिओ, व्हिडीओद्वारे आपण पोलीस, सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स, आरबीआय अधिकारी असल्याचे भासवून मोबाईलवर संपर्क साधणाऱ्या भामटय़ांवर विश्वास ठेवू नका. कुणाही अज्ञात व्यक्तीचा फोन आला तर तुम्ही गांगरून जाऊ नका! शांतपणे फोन करणाऱ्याचे म्हणणे ऐकून घ्या. त्याला प्रतिसाद देऊ नका! शंका आल्यावर ताबडतोब सायबर क्राईम ब्रँच पिंवा 1930 या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले आहे. तरीही लोकांमध्ये जनजागृती झालेली नाही. अलीकडेच मुंबईतील आणखी एका महिलेला मनी लॉण्डरिंगची, डिजिटल अटकेची भीती दाखवून ईडीच्या तोतया अधिकाऱ्यांनी तिची सारी प्रॉपर्टी विकायला लावली व 25 कोटी रुपये उकळले. कुणालाही न सांगता खऱ्या पोलिसांना न कळवता आपल्या मेहनतीची धनदौलत त्या महिलेने गमावली. ईडी पिंवा मनी लॉण्डरिंग नावाचे हे भूत येथून पुढे आणखी कुणाकुणाला आयुष्यातून उठवणार आहे हे सांगणे आता कठीण आहे. बरं, एकदा का पैसे ऑनलाइन आरोपींनी मागितलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर केले तर ते परत कधी मिळतच नाहीत. तासाभरात क्रिप्टो करन्सीने ते परदेशात पाठविले जातात. त्यामुळे तक्रारदारांना न्याय मिळत नाही. चुकून मिळाला तर तो भाग्यवानच समजावा!
गेल्याच आठवडय़ात मुंबई सायबर क्राईमच्या वरळी शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौसमी पाटील व त्यांच्या सहकारी आकांक्षा नलावडे, नवनाथ वेताळे, प्रकाश बावडेकर, जय गदगे या पथकाने उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात सुमारे 30 हजार सिम कार्ड (केवायसी डॉक्युमेंट न स्वीकारता) बेकायदेशीरपणे परदेशी नागरिक व गुन्हेगारांना विकणाऱ्या 8 जणांच्या एका टोळीला अटक केली. त्यात एअरटेल (डीएसई) कंपनीचे काही कर्मचारी, दुकानदार आदींचा समावेश आहे. या टोळीने शेअर्स ट्रेडिंग करण्यासाठी बनावट सिम कार्डचा वापर करून व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला होता व गुंतवणुकीत बराच फायदा झाल्याचा बनाव करून अन्य गुंतवणूकदारांची 50 लाखांच्यावर फसवणूक केली हे अलीकडेच पोलीस तपासात उघड झाले आहे. शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपन्या खऱ्या की खोटय़ा याची प्रत्यक्ष कंपनीच्या कार्यालयाला भेट देऊन खातरजमा करावी लागते, परंतु हे कुणीही गुंतवणूकदार करीत नाही.
बनावट तपशिलाद्वारे आपणास आधारकार्ड, पॅन कार्ड मिळते तसेच सिम कार्डही उपलब्ध होतात. आपली ओळख पटू नये, लोकेशन कळू नये म्हणून गुन्हेगार ‘VPN’ या तंत्राचा वापर करतात. त्यात आयपी अॅड्रेस दिसत नाही. त्यामुळे गुन्हेगार कुठल्या देशातून मोबाईलवरून संपर्क साधत आहे हे समजत नाही. गुगल सर्व्हर परदेशात असल्याने गुगल कंपन्यांकडूनही पोलिसांना सहकार्य मिळत नाही. याचा फायदा गुन्हेगारांना मिळत आहे. त्यामुळेच सायबर क्राईम झपाटय़ाने वाढत आहे. स्मार्ट फोन लोकांच्या मुळावर येत आहे. त्यांना आयुष्यातून उठवत आहे. सर्व आर्थिक व्यवहार हे मोबाईलवर होत असल्याने सामान्य माणसापासून ते करोडपतींपर्यंत लोक फसत आहेत. पोलीस तर मेटाकुटीला आले आहेत. तपासात तक्रारदारांचे पैसे परत मिळत नाहीत. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. या गुह्यांमध्ये राजस्थान, यूपी, बिहार आदी ग्रामीण भागातील बेकार तरुणांचा तुटपुंजी रक्कम देऊन वापर करून घेतला जातो. अशी ग्राऊंड लेवलची तळागाळातील पोरं पोलिसांच्या हाती लागतात. त्यांच्यावर कारवाई होते, परंतु रिकव्हरी मात्र शून्य असते.
जन हो सावधान! ज्या बँक खात्यातून आपण ऑनलाइन पेमेंट करतो त्या खात्यात कमी रक्कम ठेवा. अनोळखी नंबरवरून आलेला व्हिडीओ कॉल स्वीकारू नका! कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या एसएमएसला उत्तर देऊ नका. खातरजमा केल्याशिवाय कोणतीही लिंक क्लिक करू नका. ओटीपी देऊ नका! आपल्या मुलाला अटक झाली आहे, अपघातात जखमी झालेल्या आपल्या नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्याला पैशाची गरज आहे, या व अशा प्रकारच्या अज्ञात व्यक्तीच्या भुलथापांना फसू नका! असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले असून लोकांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी. नाही तर तुम्ही कधी फसाल व रस्त्यावर याल याची खात्री नाही.
सायबर माफियांकडून रोज करोडो रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात आहे, परंतु ते रोखण्यासाठी आपल्याकडे हवी तशी सुरक्षा व्यवस्था नाही. आर्थिक फसवणुकीप्रमाणे इतर सायबर गुह्यांमध्येही अलीकडे प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडियावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने महिलांना ई-मेल, एसएमएसद्वारे अश्लील संदेश, चित्र पाठवून त्यांचा लैंगिक छळ केला जात आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फसविले जात आहे. खोटे प्रोफाईल बनवून फसविण्याच्या प्रकारात तर दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर कोणतीच प्रतिबंधात्मक कारवाई होत नाही. घाबरलेल्या अर्ध्याअधिक महिला पुढे येऊन तक्रारच करीत नाहीत. इंटरनेटच्या निर्मात्याला इंटरनेटचा भविष्यात इतका गैरवापर होईल, तंत्रज्ञान शोधाचे दुष्परिणाम लोकांना भोगावे लागतील असे कधी वाटले नसेल. 25 कोटी रुपये गमावलेली ती व तिच्यासारख्या फसलेल्या अनेक महिला अजूनही सावरलेल्या नाहीत. काही तर आजही कोमात आहेत. डिजिटल अटकेचे व खाकी वर्दीतील माफियांचे भय अजूनही त्यांचा पिच्छा सोडत नाही, परंतु असे प्रकार रोज घडत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून महिलांना आयुष्यातून उठविले जात आहे. कोण आणि कसे रोखणार हे ! ‘डिजिटल इंडिया’चे मिशन साफ फेल आहे.