थार, ऑडी, 2 लाखांच घड्याळ, 85 हजारांचा चष्मा…; पंजाब पोलीस दलातील इन्स्टा क्वीन चर्चेत

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्यांमध्ये सध्या सर्वच क्षेत्रातील तरुण तरुणींमध्ये स्पर्धा सुरू आहे. पोलीस खात सुद्धा यामध्ये आघाडीवर आहे. अशीच एक इन्स्टा क्वीन पंजाब पोलीस दलात कार्यरत होती. थार, ऑडी, हातात 2 लाखांच घड्याळ आणि 85 हजार रुपयांचा चष्मा असा रुबाब या महिला पोलिसाचा होता. परंतु 17 ग्रॅम हेरॉईन या महिला पोलिसाकडे सापडली आणि अनेक धक्कादायक गोष्टी पोलीस तपासात उघडकीस आल्या.

अमनदीप कौर असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 17 ग्रॅम हेरॉईन बाळगल्याच्या आरोपाखाली तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. अमनदीप कौरचे एका आयपीएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे सुद्धा उघड झाले आहे. पोलीस त्याचा अधिक तपास करत आहेत. चंदीगड पोलिसांनी अमदीप कौरची कसून चौकशी केली आहे. चौकशी दरम्यान अमदिप कौरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने तिच्या भावाच्या, बहिणीच्या नवऱ्याच्या आणि स्वत:च्या नावावर अनेक फ्लॅट खरेदी केले आहेत. तसेच खरेदी केलेली थार गाडी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जावयाला विकली होती. त्यानंतर तीने नवीन थार खरेदी केली. त्याचबरोबर बहिणीच्या नवऱ्याला एक बुलेट गिफ्ट दिल्याचे सुद्धा तपासात उघड झाले आहे.

सोशल मीडियावर अमदीपर कौर अॅक्टीव्ह होती. विविध प्रकारच्या रील बनवण्यासाठी दोन लाख रुपयांचे घड्याळ, 85 हजार रुपयांचा चष्मा. तसेच सोन्याचे अलंकार तिने काही दिवसांपूर्वी खरेदी केले होते. याव्यतिरिक्त अमदीपच्या घरामध्ये अनेक महागड्या वस्तू असल्याचे सुद्धा तपासात उघड झाले आहे. एवढा पैसा एका पोलीस कॉन्स्टेबलकडे आला कुठून? अशा प्रश्न आता जनतेसह पोलिसांना पडला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.