भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; अजान रोखण्याचा केल्याचा प्रयत्न आरोप

हनुमान जयंतीदिवशी रात्री सव्वा आठच्या सुमारास राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी सुरू असलेली अजान रोखण्यासाठी मशिदीत शिरून गोंधळ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दर्गा ट्रस्टने केला आहे. याप्रकरणी खासदार डॉ. कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ट्रस्टने तक्रार अर्जाद्वारे फरासखाना पोलीस ठाण्यात केली आहे.

डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुण्येश्वर मंदिर परिसरातील कार्यक्रमात भाषण करताना छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गासंबंधी चिथावणीखोर विधाने केली आहेत. यासंदर्भात दर्गा ट्रस्टकडून तातडीने तक्रार अर्ज देण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान हा सर्व प्रकार धक्कादायक आणि निंदनीय आहे. हा मुद्दा आणि परिसर संवेदनशील असून, यावर अशा पद्धतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकीचे आहे. केवळ आपण अधिक कट्टरतावादी असल्याचे दाखविण्याचा हा प्रकार असल्याची टीका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली आहे.