एक दुचाकी खरेदी करायची मग बोगस कागदपत्रांच्या आधारे तिची ओएलएक्सवर विक्री करायची. पुन्हा ती दुचाकी चोरून दुसऱ्या राज्यात विकायची अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या यूपीतील चालबाज चोरांना अॅण्टॉप हिल पोलिसांनी गोव्यातून उचलून आणले. त्यांच्याकडून एक केटीएम दुचाकी, चोर मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
अॅण्टॉप हिल परिसरात राहणारे अबू संयम मो हसीन मेहबूब शेख (25) या तरुणाने ओएलएक्सवरून एक केटीएम दुचाकी खरेदी केली होती. सीजीएस कॉलनीतील जामा मशीदजवळ अबूने ती दुचाकी पार्क केली असताना ती अज्ञाताने चोरून नेली होती. अबू याने तशी तक्रार दिल्यानंतर अॅण्टॉप हिल पोलिसांनी दुचाकी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सपोनि शिवाजी मदने तसेच सानप, घुगे, टेळे, हनुमंते, पवार, विसपुते या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा अबू याची चोरलेली दुचाकी आरोपी गोव्याला घेऊन गेल्याचे कळताच पथकाने तत्काळ गोवा गाठून सदाफ अन्सारी (27) आणि शारिक अन्सारी (23) या दोघांना पकडले. तपासात हे आरोपी करत असलेले वेगळेच कांड समोर आले. या आरोपींनी अजून अशा पद्धतीने किती गुन्हे केलेत याचा पोलीस शोध घेत आहेत.
बोगस कागदपत्र आणि जीपीएसचा खेळ
यूपीत राहणाऱ्या या दोघांनी दिल्लीत एकाकडून केटीएम दुचाकी खरेदी केली. मग तिचे बोगस कागदपत्र व नंबर प्लेट बनवून ती ओएलएक्सवर विक्रीसाठी ठेवली. लखनौतील एकाने ती दुचाकी खरेदी केली, पण दुचाकी देतेवेळेस तिच्यात जीपीएस यंत्रणा बसवली. त्यामुळे दोन दिवसांनी दुचाकी लखनौतील ज्या ठिकाणी पार्क केलेली होती तेथे आरोपी गेले. मग ती दुचाकी चोरून त्यांनी हैदराबाद गाठले. तेथे दुसऱ्याच्या नावाने बोगस कागदपत्र बनवून त्याआधारे पुन्हा ती दुचाकी ओएलएक्सवर विकली. त्यानंतर हैदराबादमध्येच त्यांनी दुसरी केटीएम चोरली. ती मुंबईत आणून पुन्हा ओएलएक्सवरून अबू याला विकली. त्या दुचाकीतदेखील जीपीएस बसवली होती. त्यामुळे सीजीएस कॉलनीत असल्याचे कळल्यानंतर त्यांनी ती चोरली आणि गोवा गाठले, पण गोव्यात त्यांची डाळ शिजली नाही आणि मदने व त्यांच्या पथकाने दोघांना उचलले.