भिवंडीत बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे पोलिसांकडून उद्ध्वस्त, 25 दिवसांत 23 जणांच्या मुसक्या आवळल्या

घुसखोरी करून भाड्याच्या घरात वात्सव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे अड्डे भिवंडी पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहेत. पोलिसांनी धडक कारवाई करत गेल्या 25 दिवसांत जवळपास 23 बांगलादेशी नागरिकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. तर काहींना अटक केली आहे.

घुसखोर बांगलादेशींविरोधात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांना हनुमान टेकडी परिसरात काही बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करत रोझी गायन, बेगम मोसम्मद, रशिदा खलिफा या तीन महिलांना ताब्यात घेतले. तसेच कामतघर येथील हनुमाननगर येथून शाहिद अन्सारी याला ताब्यात घेतले. या सर्व नागरिकांची चौकशी केली असता त्यांच्याकडे हिंदुस्थानी नागरिकत्वाचे कोणतेही पुरावे, कागदपत्रे, ओळखपत्रे, परवाना किंवा पारपत्र नसल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडीत वर्षभर बांगलादेशींविरोधात कारवाई सुरू आहे. डिसेंबर महिन्यात सुरू केलेल्या कोम्बिंग ऑप्रेशनदरम्यान 23 जणांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत 33 घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. ताब्यात घेतलेले बहुतांश बांगलादेशी मजुरी, प्लम्बिंगचे काम करतात तर महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या आहेत. हे नागरिक दलालांच्या मदतीने त्यांना बनावट ओळखपत्रे व बोगस कागदपत्रे तयार करून देत असल्याचे समोर आले आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
■ मोहन दहीकर, पोलीस उपायुक्त, भिवंडी