पुण्यात चोरीचा लॅपटॉप विकण्यासाठी आलेला पोलिसांच्या जाळ्यात; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

नामांकित अ‍ॅप्पल कंपनीचा चोरी केलेला लॅपटॉप विकण्यासाठी आलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून साडेचार लाख रुपये किमतीचा लॅपटॉप आणि 25 हजार रुपयांचे दोन मोबाइल असा एकूण पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रोहित शंकर साठे (वय 20, रा. गुजरवाडी, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

चोरीच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांनी तपास पथकाला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदारांनी पावले उचलली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंमलदार निलेश खैरमोडे व विठ्ठल चिपाडे यांना एकजण कात्रज तलाव येथे चोरीचा लॅपटॉप विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार सापळा रचून पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून महागडा लॅपटॉप आणि दोन मोबाइल जप्त केले. वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, अंमलदार निलेश खैरमोडे, विठ्ठल चिपाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.