
गस्तीवर असलेल्या वाहतूक पोलिसांशी दोघांनी हुज्जत घातल्याची घटना कांदिवलीच्या चारकोप परिसरात घडली. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी शिवानंद चौहान याला अटक केली असून दुसरा पळून गेला आहे.
तक्रारदार हे कांदिवली वाहतूक विभागात काम करतात. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या सहकाऱ्यासोबत चारकोप परिसरात कर्तव्य बजावत होते. तेव्हा स्कुटीवरून जाणाऱ्या दोघांना तक्रारदार यांनी अडवले. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जात होती. त्याचा राग डोक्यात ठेवून त्या दोघांनी तक्रारदार यांच्यावर चावीने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करून आक्षेपार्ह विधाने केली. या घटनेची माहिती समजताच चारकोप पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी शिवानंदला ताब्यात घेतले. तर एक जण पळून गेला आहे.