घुसखोर बांगलादेशींची शांतीत क्रांती; बांधकामाच्या ठिकाणी मजुरी, मिळेल तिथे वास्तव्य, कमावलेल्या पैशांतील अर्धीरक्कम मायदेशी पाठवायची

हिंदुस्थानात घुसखोरी करणारे बांगलादेशी नागरिक मस्तपैकी शांतीत क्रांती करत आहेत. बांधकामाच्या ठिकाणी काम मिळवून ते तेथेच मिळेल त्या जागेत वास्तव्य करतात. शिवाय मोलमजुरी करून कमावलेल्या पैशातील अर्धी रक्कम ते एजंटच्या मार्फत मायदेशी पाठवितात, अशा प्रकारे त्यांचे मस्त चांगलले आहे. पोलिसांनी घुसखोर बांगलादेशींविरोधात अलीकडे जोरदार मोहीम उघडली होती, पण  आता त्या कारवाया तितक्या प्रमाणात होत नसल्याचे चित्र आहे.

बांगलादेशात हिंदुस्थानी नागरिकांवर अत्याचार होऊ लागल्यानंतर हिंदुस्थानात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा बांगलादेशींविरोधात धडक मोहीम राबवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवायादेखील सुरू केल्या होत्या, परंतु त्या कारवाया  प्रभावी नसल्याचे चित्र आहे. बांगलादेशींना त्यांच्या मायदेशात पाठविले तरी काही दिवसांनंतर ते पुन्हा हिंदुस्थानात घुसखोरी करतात. मग बांगलादेशी किंवा हिंदुस्थानातील एजंट घुसखोरांकडून ठरावीक रक्कम घेऊन त्यांना आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शिधावाटप पत्रिका बनवून देतात. ते बांगलादेशी असल्याची ओळख लपवतात.

स्थायिक होण्यासाठी बांधकाम ठिकाणांचा आधार

हिंदुस्थानात नव्याने घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना येथील एजंट हे मुंबई, नवी मुंबई, ठाणे (भिवंडी, कल्याण), पुणे या शहरांमध्ये स्थायिक होण्याकरिता तेथे विविध ठिकाणी सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे पंत्राटदार यांच्या अख्यत्यारीत पेंटर, बिगारी, प्लंबर, कारपेंटर, इलेक्ट्रिशियन आदी प्रकारच्या  कामाकरिता नोकरीस ठेवतात. शिवाय ते भाजी विक्री, फेरीवाले अशीही कामे करतात. याशिवाय बांगलादेशी महिला व तरुणी डान्सबार, वेश्याव्यवसाय, घरकाम अशा प्रकारची कामे करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात.

असा जातो इकडचा पैसा तिकडे

बांगलादेशी अधिकृत वैद्यकीय व्हिसावर उपचारकामी हिंदुस्थानात येतात. मग ते घुसखोर बांगलादेशींना आवश्यक ती मदत करतात. बांगलादेशींचा पैसा ते कमिशन बेसवर बांगलादेशातील त्यांच्या नातेवाईकांना पोहचवतात.

हिंदुस्थानी पासपोर्टच्या आधारे परदेशात नोकरी

बरेच घुसखोर बांगलादेशी नागरिक हिंदुस्थानातील आवश्यक कागदपत्र बनवून त्याआधारे पारपत्र मिळवतात. मग त्या पारपत्राच्या जोरावर ते हिंदुस्थानी नागरिक म्हणून परदेशात नोकरी मिळवतात.