
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून गेल्या साडेसहा वर्षांत काही पोलिसांकडून शिस्तभंगाच्या घटना घडल्या. पोलिसांचा चोरी, दरोडा, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतदेखील सहभाग आढळून आला. अशा गैरव्यवहार आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्या तब्बल 30 पोलीस अधिकारी आणि 78 अंमलदार अशा एकूण 108 पोलिसांवर गेल्या साडेसहा वर्षांत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सांगवी पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाचा वाढदिवस रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. विशेष म्हणजे सांगवी पोलीस ठाण्यासमोरच मध्यरात्री भररस्त्यात गोंधळ घालत फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगवीच्या वरिष्ठ निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे सर्वच पोलिसांना मान खाली घालावी लागली. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या बेशिस्त वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची ऑगस्ट 2018 मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून गेल्या साडेसहा वर्षांत तब्बल 108 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शिस्तभंगाच्या घटना घडल्या असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापैकी काही पोलिसांचा चोरी, दरोडा, खंडणी, अमली पदार्थांची तस्करी अशा गंभीर गुन्ह्यांतदेखील सहभाग असल्याचे समोर आले आहे.
अशा काही मूठभर गुन्हेगारी प्रवृत्तींच्या पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलाला दोष दिला जातो. सोशल मीडियावर अनेकजण संपूर्ण पोलीस दलाला टार्गेट करतात. वर्दीत असलेल्या अनेक प्रामाणिक पोलिसांना याचा नाहक मोठा फटका सहन करावा लागतो. अशा घटनांमुळे पोलिसांची विश्वासार्हता डागळली असली, तरी कठोर कारवाईमुळे प्रशासनाचे सकारात्मक चित्र निर्माण होत आहे. पोलीस खात्यातील चांगले अधिकारी आणि कर्मचारी हे आपली जबाबदारी योग्य पार पाडत आहेत, हेसुद्धा नाकारून चालणार नाही.
गैरव्यवहार, बेशिस्त वर्तनाच्या काही घटना
- सांगवीत अमली पदार्थ विकून कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या फौजदाराला रंगेहाथ पकडले.
- सुट्टीवर असताना गणवेश घालून फौजदाराने पुण्यातील हॉटेल चालकाला खंडणी मागितली.
- हिंजवडीत फौजदाराने चहाच्या बहाण्याने तरुणीच्या घरात प्रवेश करून महागडे घड्याळ चोरले.
- चाकण पोलीस ठाण्यातील तपास पथकप्रमुखाचा 27 लाखांच्या दरोड्यात सहभाग.
- गहुंजे येथे खून प्रकरणात आरोपींना वाचवण्यासाठी फौजदाराकडून मृत तरुणावरच लुटमारीचा गुन्हा.
- गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दोन पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 5 लाख रुपये उकळले.