
रात्रीच्या वेळेस कर्कश हॉर्न वाजवत धूम स्टाईलने वेडीवाकडी वळणे घेत मोटारसायकल चालवणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. शनिवारी रात्री वांद्रे ते अंधेरी येथील पोलीस ठाण्यात एकूण 43 गुन्हे नोंद करून 214 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीस करत आहेत, पण रात्रीच्या वेळेस बेशिस्त चालक हे कर्कश हॉर्न वाजवत सुसाट वेगात वाहने चालवतात. सुसाट वेगात वाहन चालवताना ते बेशिस्त चालक अचानक कट मारून जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. रात्रीच्या वेळेस बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या.
शनिवारी रात्री पश्चिम प्रादेशिक विभागात (वांद्रे ते अंधेरी) मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत खास नाकाबंदी लावली होती. रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करत होते. पोलिसांनी रात्री एकूण 43 गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करून पोलिसांनी 214 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार एकूण 629 वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे कारवाई करण्यात येणार आहे.