अमरावती एमआयडीसीत विषबाधा, कंपनीतील 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश  

अमरावतीच्या नांदगाव पेठ येथील एमआयडीसीमधील गोल्डन फायबर कंपनीतील 100 पेक्षा जास्त कामगारांना विषबाधा झाली आहे. यात महिलांची संख्या जास्त असून महिलांना उलटय़ा आणि मळमळण्याचा त्रास झाला. सर्वांना रुग्णांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सकाळचा नाश्ता किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

अमरावतीत काही दिवसांपूर्वी एका शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असताना आता नांदगाव पेठ एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीत महिलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी पाणी प्यायल्यापासून उलटय़ा आणि मळमळचा त्रास सुरू झाला आहे. त्याचबरोबर पोट दुखत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. कंपनीत अंदाजे 700 महिला काम करत असल्याचे म्हटले जात आहे.

बिस्कीटच्या पुड्यात अळ्या 

अमरावतीत बिस्कीटच्या पुडय़ात अळय़ा सापडल्याची घटना घडली. नारायण कराडे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. नारायण कराडे यांनी दुपारी शहरातील डी मार्ट मॉलमधून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. यासोबतच बिस्किटांचीदेखील खरेदी केली होती, मात्र घरी आल्यानंतर बिस्कीट उघडताच त्यातून अळय़ा बाहेर पडल्याचा प्रकार घडला. यामुळे ग्राहकांच्या जिवाशी खेळ करणाऱयांविरुद्ध अन्न आणि औषध प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी कराडे यांनी केली आहे.