परीक्षण- नितांतसुंदर अनुभवचित्रे

>> प्रज्ञा जांभेकर

ऐलमा पैलमा गणेशदेवा 

खरं खरं सांगा करीन तुमची सेवा 

ऐलमा पैलमा आता एक करा देवा 

बाईच्या योनीला दोन दात तरी ठेवा’ 

काय दचकलात ना? केवढं भीषण वास्तव सांगते ही कविता. प्रसिद्ध कवी किरण येले यांच्या ‘बाई बाई गोष्ट सांग’ या कवितासंग्रहातल्या ‘ऐलमा पैलमा गणेशदेवा’ या कवितेतल्या या ओळी आपल्याला निर्भया ते कोलकाता बलात्कार प्रकरणाच्या वाईट स्मृतींची आठवण करून देतानाच विचार करायला लावतात. खरं तर कळत्या वयापासून ‘ऐलमा पैलमा’ हे भोंडल्याचं गीत म्हणून ऐकलेलं. याच गाण्याचा समर्पक वापर करून काळ बदलला आहे याची जाणीव येले यांनी विडंबनातून करून दिली आहे. बलात्कारासारखे अत्याचार अनेकदा सिद्ध करताना अवघड असतात. अशा वेळी ‘योनीला दात असतील तर…’ अशी कल्पना कवी करतो. या कवितेत सामाजिक विसंगतींवर नेमकं बोट ठेवलेलं आहे. अशा अनेक कविता मन सुन्न करतात, डोळ्यांत पाणी आणतात. विचारप्रवृत्त करतात. आपल्या प्रत्येकाच्या मनात काही प्रश्न कधी ना कधी येऊन गेलेले असतात. पुरुषाला वाटलेलं असतं, मी स्त्राr झालो असतो तर आणि बाईला वाटत असतं, मी पुरुष झाले असते तर!

‘एक दिवस अचानक अचानक म्हणजे अचानकच

तिच्या मनात आलं आपल्याला लिंग असतं तर’

सेक्सच्या पलीकडेही स्त्री-पुरुष संबंधांना अनेक आयाम आहेत. ते दोघंही माणूस आहेत आणि त्याच तराजूतून त्यांचं मोजमाप व्हायला हवं याचं भान ही कविता देते.

‘बाईच्या कविता’ हा कवीचा गाजलेला कवितासंग्रह. ‘आदमी औरत के साथ सोता है, जागता क्यों नहीं’ या इमरोज यांच्या मार्मिक वाक्यात पहिल्या संग्रहाचं सार सामावलेलं आहे. दुसऱया कवितासंग्रहातही अशा 53 कविता आपल्याला खिळवून ठेवतात. ‘बाई म्हणजे मीठ’ ही एकाच ओळीतली कविताही विचार करायला लावते. मीठ का म्हटलं असेल बाईला? या प्रश्नाचं उत्तर शोधतच आपण पुढच्या पानावर जातो. अशी एक-एक कविता चित्रासारखी समोर उभी राहत गेली. प्रत्येक जण यातल्या कविता वाचता वाचता त्यातल्या शब्दांशी आपसूक जोडला जातो, असं या कवितांचं स्वरूप आहे.

‘बाईच्या अंगमोऱया छातीवर वा मांडीवर

बहुतांशी डाव्या असतो एक तीळ वा डाग’ या ओळी उत्सुकता ताणतात.

 या कविता सलगपणे अनुभवत जाणं हाच एक नितांतसुंदर असा अनुभव. एका पुरुषाने बारकाईने निरीक्षण करून साकारलेल्या या कवितांनी व्यक्त होण्याची ऊर्मी अधिक बळावते ती फक्त स्त्राr म्हणून नाही, तर माणूस म्हणून. स्त्राr-पुरुष संबंध, त्याचा दोघांच्या चारित्र्याशी लावलेला संबंध याला एकविसावं शतकही अपवाद नाही. त्यामुळे यातल्या कविता वरकरणी फक्त स्त्राrवरच्या वाटल्या तरी त्यातल्या अनेक कविता दोघांनाही लागू होणाऱया आहेत. उदाहरण देता येईल ते ‘बाई दार उघड’ या कवितेतल्या

‘दे फेकोनिया शतकांचा अंधार

घे फासोनिया भाळावर अंगार’  या दोन ओळींचे.

बाईच्या कविता समतोलपणे स्त्राrवाद जोपासतात. काही ठिकाणी त्यांना समस्या स्वच्छपणे दिसल्या असल्या तरी त्या गुंतागुंतीच्या असल्यामुळे त्यांनी भीषण वास्तव आपल्यासमोर मांडलं आहे, ते त्यांच्या परिप्रेक्ष्यातून.

‘बये इतकं सोपं नाही स्वत:ची तसबीर सांभाळणं  

बये इतकं सोपं नाही स्वत:ला समजून घेणं  

जितकं तू समजतेस’ 

कवितासंग्रहातील पहिला भाग ‘बये इतकं सोपं नाही तुला भोगणं’. या भागातल्या कविता समजायला अधिक सोप्या आहेत. ‘बाई दार उघड’ या दुसऱया भागात लय सांभाळताना भाषा थोडी आलंकारिक आणि काहीशी अवघड वाटू शकते तरी दुसऱयांदा वाचल्यावर त्यातलं मर्म मनाचा ठाव घेतं. कारण त्यातले सूक्ष्म संदेश आपल्याशी संवाद साधायला लागतात. सर्वसामान्य स्त्राr त्यांच्या कवितांमध्ये अधिक डोकावते आणि ते साहजिकही आहे कारण त्यांची संख्या. या सर्वसामान्य स्त्रियांमध्येही त्या स्त्रिया असल्यामुळे जे लहानसहान गोष्टींतलं असामान्यत्व दडलेलं आहे हे या कविता सांगतात, पण आपल्याला महिला पूर्णपणे समजल्या आहेत असा अनाठायी दावा त्यांनी एकाही कवितेत केलेला नाही. फक्त एखाद्या ठिकाणी सामान्यीकरण होतंय का? असं वाटून जातं, पण ते एक क्षणभरच. जसे की ‘बाई चालली कामाला’ या कवितेत ‘तिच्या लेखी मोल नाही कसलं कामाला’ ही ओळ खटकते. येथे त्यांना नेमका कुठला स्त्राr वर्ग अभिप्रेत आहे हे समजत नाही. स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य नसणं हे त्यांच्या सगळ्या समस्यांचं मूळ आहे, असं संशोधन अहवाल सांगतात. अशी एखाददुसरी ओळ सोडता त्यांनी अत्यंत बारकाईने स्त्राrच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडून दाखवले आहेत. मग ते मासिक पाळी, सेक्स असे विषयही दिलखुलासपणे मांडतात.

‘महिन्याच्या ठरावीक दिवसांत 

वाहून जातं अशुद्ध रक्त 

आणि बाई उजळून निघते 

चिंचेच्या कोळानं झळाळून निघावी 

समई तशी’  

किरण येले संवेदनशील कवी तर आहेतच, पण त्या पलीकडे जात ते त्यांच्या भावनाविश्वात आपल्याला घेऊन जातात. सूक्ष्म निरीक्षण हा त्यांचा स्थायिभाव त्यांच्या कवितांमधून दिसतो. त्यांच्या कवितांतून डोकावतो तो एक सजग आणि सच्चा माणूस. अनेक सामाजिक विसंगतींवर बोट ठेवणाऱया त्यांच्या कविता म्हणूनच मनाला थेट भिडतात, जवळच्या वाटतात. या कवितांमध्ये चालू घडामोडींचं भान सुटत नाही आणि वास्तवाशी असलेली नाळही तुटत नाही. अनुभवविश्व संपन्न करणारी ही आशयघन कविताचित्रे तुम्हालाही नक्की आवडतील यात शंका नाही.

बाई बाई गोष्ट  सांग 

कवी : किरण येले

प्रकाशक : ग्रंथाली    मूल्य : 150 रुपये