मुंबईत आता प्रदूषणमुक्त अंत्यसंस्कार, विद्युत किंवा पीएनजीचा वापर करणार

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या स्मशानभूमीत आता प्रदूषणमुक्त अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत किंवा पीएनजीचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नऊ स्मशानभूमीत या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर पारंपरिकपणे अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडी चिता पद्धती, विद्युत दाहिनी व गॅस दाहिनी पद्धतीचा वापर केला जातो. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लाकडाचा वापर केला जातो. यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी कमी प्रदूषण शिवाय इंधनाची बचत होईल या दृष्टीने खबरदारी घेतली जाणार आहे. जिथे पर्यावरणपूरक दाहिन्या नाहीत तेथे आता पर्यावरणावर अनुकूल अशा चिता बांधकाम करण्य़ाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या चिता पारंपरिकऐवजी विद्युत किंवा पीएनजीवर आधारित असतील. पालिकेने 2020 पासून या पद्धतीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेच्या शीव स्मशानभूमीमध्ये केला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईतील नऊ स्मशानभूमींमध्ये वापर केला जाणार आहे. यासाठी सुमारे 29 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

या आहेत स्मशानभूमि

भोईवाडा स्मशानभूमी
रे रोड वैपुंठ स्मशानभूमी
वडाळा गोवारी स्मशानभूमी
विक्रोळी टागोरनगर स्मशानभूमी
गोवंडी देवनार स्मशानभूमी
चेंबूर पोस्टल कॉलनी अमरधाम स्मशानभूमी
बोरिवली बाभई स्मशानभूमी
ओशिवरा स्मशानभूमी
गोरेगाव स्मशानभूमी

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता मुंबईतील नऊ स्मशानभूमींमध्ये वापर केला जाणार आहे.