
तब्बल 13 हजार 850 कोटी रुपयांचा बँक घोटाळा करून देशाबाहेर पळालेला घोटाळेबाज हिरेव्यापारी गीतांजली जेम्सचा मालक मेहुल चोकसी याला हिंदुस्थानात आणण्यासाठी बेल्जियम सरकारला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. चोकसी त्याच्या पत्नीसह बेल्जियममध्ये राहत आहे.
चोकसी बेल्जियममधील अँटवर्प येथे राहत आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातनं तो 2018 मध्ये हिंदुस्थानातून अँटिग्वा-बार्बुडा येथे पळून गेला. मेहुल चोकसी आणि नीरव मोदी यांच्यावर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रँडी हाऊस शाखेत 13 हजार 850 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तत्पूर्वी चोकसीने त्याचा पासपोर्ट निलंबित झाल्यामुळे तो हिंदुस्थानात परतू शकत नसल्याचे कारण दिले होते. दरम्यान, चोकसीने 2018 मध्ये हिंदुस्थान सोडण्यापूर्वी 2017 मधील अँटिग्वा-बार्बुडाचे नागरिकत्व घेतले होते. त्याने प्रकृती बिघडल्याचे कारण देत हिंदुस्थानात येण्यास वारंवार नकार दिला. हिंदुस्थानातील त्याच्या अनेक मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.