तपास यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळेच घोटाळेबाज देशाबाहेर पसार झाले, विशेष न्यायालयाकडून खरडपट्टी

नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय मल्ल्या यांच्यासारखे कोट्यवधींचे घोटाळे करणारे घोटाळेबाज देश सोडून पसार होण्यात यशस्वी झाले. यामागे तपास यंत्रणांचा निष्काळजीपणा आहे. कारण त्यांनी योग्य वेळी या सगळ्यांना अटक केली नाही, अशा शब्दांत पीएमएलए विशेष न्यायालयाने खरडपट्टी काढली आहे.

पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी मनी लाँड्रिंग केसचे आरोपी असलेल्या व्योमेश शहा याच्या याचिकेवर सुनावणी करताना ही खरडपट्टी काढली. या याचिकेत शहा याने आपल्या जामिनाच्या शर्तींमध्ये बदल करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्याची विनंती मान्य करत परदेशी जाण्यापूर्वी न्यायालयाची परवानगीची अट रद्द केली होती.

दरम्यान, ही अट हटवण्याला ईडीने विरोध केला. शहाची याचिका स्वीकारल्यास नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि मेहुल चोकसी यांच्यासारखी परिस्थिती होईल, असा युक्तिवाद ईडीने यावेळी केला. मात्र, हा युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालय म्हणालं की, तपास यंत्रणांच्या निष्काळजीपणामुळेच हे आरोपी देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरले. जर वेळीच त्यांनी या आरोपींना अटक केली असती तर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत त्यांनी यंत्रणाची खरडपट्टी काढली. मात्र या तिघांपेक्षा वेगळं वर्तन व्योमेश याने दाखवलं असून त्याने जबाब देण्यासाठी न्यायालयात हजेरी लावली आणि जामीन मिळवला. तसंच, परदेशात जाण्यासाठी अर्जही केला. त्यामुळे या प्रकरणाची तुलना अन्य तिघांसोबत करता येणार नाही, असं न्यायालयाने यावेळी म्हटलं.